कोसंबीच्या आदिवासींचे राजुऱ्यात बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:14 PM2018-07-25T23:14:43+5:302018-07-25T23:15:17+5:30
माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसºया दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोहनू सिडाम (५५) व वैजुबाई मंगाम (५८) अशी उपचार घेत असलेल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. मागील अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील कोसंबी येथील जमिनीचा वाद सुरु आहे. सध्या काही जागेवर आदिवासी कोलाम झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. शेतीवर हंगामी कामे करुन पेरणी करीत आहे. तरीही माणिगकड कंपनीकडून कायदेशिर अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. या जमिनीसंदर्भात १७ आॅगस्ट १९८१ रोजी माणिकगड कंपनी व जिल्हाधिकाºयांमध्ये झालेला करार नियमबाह्य व कायद्याची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप सोमवारी कुसुंबीच्या आदिवासींनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबर १९८४ रोज अहवाल दिला तर १९८१ मध्ये करार झाला कसा, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, सोमवारपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारीही उपोषण सुरूच होते.