आदिवासींचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:11 PM2018-03-20T23:11:09+5:302018-03-20T23:11:59+5:30

चंद्रपूर शहर व जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा चंद्रपूर नगरीला असताना आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून आदिवासींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे.

Tribal Front | आदिवासींचा धडक मोर्चा

आदिवासींचा धडक मोर्चा

ठळक मुद्देउपोषण सुरूच : चंद्रपुरातील चौकांना आदिवासी थोर पुरुषांची नावे द्यावी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर शहर व जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा चंद्रपूर नगरीला असताना आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून आदिवासींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात आदिवासींनी धरणे, मोर्चे, आंदोलने करून चंद्रपूर शहरातील चौकांना आदिवासी थोर पुरुषांचे नावे देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मंगळवारी आदिजन चेतना जागर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
चंद्रपुरातील गिरणार चौकास आदिवासी वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, कारागृह परिसरात वीर बाबुराव शेडमाके यांना फासावर चढवण्यात आले होते. त्या जागेवर शहीद स्मारक उभारावे, जटपुरा गेटच्या आतील बाजुस राजे खांडक्या बल्लाळशाह यांचा पुतळा उभारण्यात यावा, अंचलेश्वर गेट परिसरात महाराणी हिराई यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, रेल्वे स्टेशन चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात यावे, बल्लारपूर बायपास रस्त्यावरील इंजिनिअरिंग कॉलेज चौकात महाराणी दुर्गावती यांचा पुतळा उभारण्यास यावा, कुंभार सहकारी संस्थेची जागा आदिवासी समाजाचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी समाजाला विनाअट हस्तांतरण करावी आदी २६ मागण्यांसाठी मोर्चा काढला.
या मोर्चात अशोक तुमराम, राजू झोडे, मनोज आत्राम, मोनल भडके, जितेश कुळमेथे, राजेंद्र धुर्वे, हरिश उईके, विनोद तोडराम, युवराज मेश्राम, जयवंत वानोडे, डॉ. अरविंद कुळमेथे, नरेंद्र मडावी, बाळू कुळमेथे, जमुना तुमराम, वंदना मेश्राम, वैशाली मेश्राम, गणेश मेश्राम, संपत कोरडे, गणेश इसनकर, मीनाक्षी गेडाम यांच्यासह शेकडो आदिवासी समाजबांधवांचा सहभाग होता.
सातव्या दिवशीही उपोषण सुरूच
आदिवासी समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याने मंगळवारी सातव्या दिवशीही उपोषण सुरूच होते.

 

 

Web Title: Tribal Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.