आदिवासी घेतात ३० रुपये घागर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:30 PM2018-02-24T23:30:37+5:302018-02-24T23:30:37+5:30
जिवती तालुक्यातील मौजा शंकरपठारवासीयांवर भीषण जलसंकट ओढवले आहे. त्यांच्यावर चक्क पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे.
फारूख शेख।
आॅनलाईन लोकमत
पाटण : जिवती तालुक्यातील मौजा शंकरपठारवासीयांवर भीषण जलसंकट ओढवले आहे. त्यांच्यावर चक्क पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी तीन किमीचे पायपीट करा; अन्यथा ३०० रुपये प्रति घागर पाणी घ्यावे लागत आहे.
भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया मौजा शंकरपठार येथील ग्रामस्थ सध्या पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. एकतर गावातील एखाद्याच्या घरगुती बोअरींगवरून ३० रुपये घागर याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. नाहीतर तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पिट्टीगुडा येथून पाणी आणावे लागत आहे.
८० घरांची वस्ती असणारे शंकरपठारची लोकसंख्या ५०० च्या जवळ असून गावात शासकीय बोअरवेल व दोन विहिरीही आहेत. सदर बोअरवेल मागील दोन वर्षांपासून बंद असून विहिरींनीही तळ गाठला आहे. गावात लाखो रुपये खर्चुन नळयोजना कार्यान्वित केली. मात्र तीदेखील विद्युत बिल न भरल्याने मागील चार वर्षांपासून बंद आहे. यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गावात दोन घरगुती हातपंप आहेत. ज्यांच्या मालकीच्या हे हातपंप आहे, ते एक घागर पाण्यासाठी ३० रुपये घेतात. ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाही, त्यांना तीन किमी बैलगाडीने पहाटे ४ वाजतापासून पाण्यासाठी पिट्टीगुडा येथे जाऊन पाणी आणावे लागत आहे. आता उन्हाळ्याची चाहुल लागताच पिट्टीगुडावासीयांनीही पाणी नेण्यास बंदी घातली आहे, असे गोपीनाथ भगवान पोले, हरी नागोराव बाजगीर, नारायण नागोराव बाजगीर या गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शंकरपठार येथे नवीन बोअरवेल खोदण्यासाठी शासनकडे प्रस्ताव पाठविला असून मंजुरी मिळताच बोअरवेल खोदली जाईल.
- संजय आत्राम, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, भारी.