आदिवासी महिलांनी तयार केलेला तिरंगा पंतप्रधान कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:12 AM2018-11-20T00:12:28+5:302018-11-20T00:14:25+5:30
जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र बचत गटांच्या महिलांसाठी रोजगाराचे नवे माध्यम ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो लक्षवेधक ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र बचत गटांच्या महिलांसाठी रोजगाराचे नवे माध्यम ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो लक्षवेधक ठरला आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरपासून पूर्वेस १६ कि.मी. अंतरावर चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची भव्य इमारत बांबूपासून तयार केली जात आहे. ती इमारत साकारण्यापूर्वीच विदेशी माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.
या प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झाल्यापासून बांबूपासून तयार झालेल्या वस्तू घराघराच्या दिवाणखाण्याची शोभा वाढवीत आहेत. इतकेच नव्हे, तर दुकानासह मोठमोठ्या शोरुम व हॉटेल्समध्ये आपली स्थान निर्माण करीत आहे. यामुळे तेथे ये-जा करणाऱ्यांनाही या वस्तू भुरळ घालत आहेत. विशेष म्हणजे, या वस्तू बचत गटांच्या महिला तयार करीत आहेत.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आजघडीला ग्रामीण भागातील एक हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. या महिला आता बांबूपासून वस्तू तयार करण्यात निपून झाल्या आहेत. त्यांनी बांबूपासून तयार केलेला देशाचा तिरंगा लक्ष वेधक ठरला आहे. ज्यांनी हा तिरंगा बघितला त्यांना तो हवाहवासा वाटावा असाच आहे. या तिरंग्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भुरळ घातली.
प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी तयार केलेला हा तिरंगा पंतप्रधान कार्यालयाची शोभा वाढवत आहे, हे विशेष.
"बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोहचला आहे. ही चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमान वाढविणारी बाब आहे. या महिलांनी बांबूपासून सरस वस्तू तयार केलेल्या आहेत. रक्षाबंधनाला तयार केलेल्या राख्यांना मोठी मागणी होती. या ठिकाणी एक हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. यापुढेही हे रोजगाराचे मोठे केंद्र म्हणून पुढे येईल."
सुधीर मुनगंटीवार,वनमंत्री, महाराष्ट्र राज्य.
"या महिलांनी बांबूपासून सरस वस्तू तयार केल्या आहेत. देशपातळीवर एक मोठे प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास यावे, असा आमचा मानस आहे."
राहुल पाटील (आयएफएस), समन्वयक,
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, चंद्रपूर.