जिल्ह्यातील पहिल्या मुलींच्या शाळेला विद्यार्थ्यांची मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:09+5:302021-01-04T04:24:09+5:30
चंद्रपूर : महाराष्ट्रात शिक्षणाची दारे खुली होत होती. त्याच काळात ब्रिटिश अधिकारी कर्नल लुसी स्मिथ यांनी धाबा येथे मुलींसाठी ...
चंद्रपूर : महाराष्ट्रात शिक्षणाची दारे खुली होत होती. त्याच काळात ब्रिटिश अधिकारी कर्नल लुसी स्मिथ यांनी धाबा येथे मुलींसाठी शाळा सुरू केली. चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन झालेली ही मुलींची पहिली शाळा होती. १०० वर्षापासून ही शाळा ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदीनी या शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सलामी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा या गावात ब्रिटिशांची सत्ता होती. लगताच्या आंध्रप्रदेशावर ( आताचा तेलंगणा प्रदेश ) नजर ठेवण्यासाठी येथे ब्रिटिशांचा तुकड्या तैनात होत्या. १८८८ मध्ये कर्नल लुसी स्मिथ ब्रिटिश तुकडीचे प्रमुख झाले. धाबा येथे कर्नल स्मिथ वास्तव्यास असताना त्यांनी सन १८८७ साली मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केली. एका झोपडीत त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. जिल्ह्यातील धनिकांनी केलेल्या मदतीतून शाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात झाली. इमारत उभी झाल्यानंतर मुलामुलींची शाळा सुरू झाली.सन १८८८ पासून ही शाळा ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहे. जिल्ह्यातील ही मुलींची पहिली शाळा ठरली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी या शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सलामी दिली. यावेळी मुख्यधापक पुरुषोत्तम ताडशेट्टीवार, जया उत्तरवार
प्रवीण मेश्राम ,नीलेश झाडे, रूपेश भगत, आशिष मुंजनकर, सूरज झाडे, निखिल चंदनगिरीवार, प्रदीप खारकर, सूरज फरकडे उपस्थित होते.
इमारतीचे जतन करा
ब्रिटिशांनी बांधलेली इमारत आता जीर्ण झाली आहे. ही इमारत जमिनदोस्त करून नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मध्यंतरी केला होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला. नव्या इमारती बांधण्यासाठी शाळा परिसरात मोकळी जागा आहे. या इमारतीचे जिल्हा प्रशासनाने जतन करावे अशी मागणी प्रवीण मेश्राम यांनी केली आहे.