तूर डाळ साठेबाजीविरोधात तंबी
By admin | Published: July 17, 2016 12:33 AM2016-07-17T00:33:03+5:302016-07-17T00:33:03+5:30
जिल्ह्यात पुन्हा तूर डाळीचे दरवाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेऊन साठेबाजी केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली.
पुरवठा अधिकाऱ्याची बैठक : किमतीतील तफावत कमी करण्याचे निर्देश
चंद्रपूर : जिल्ह्यात पुन्हा तूर डाळीचे दरवाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेऊन साठेबाजी केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली. तसेच साठेबाजी करून सर्व सामान्य ग्राहकांना वेठीस न धरण्याचा सल्लाही दिला.
डाळींच्या भाववाढीला लगाम घालण्याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिस्कीन यांनी आपल्या कार्यालयात धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गेल्या वर्षी तूर डाळीने भाव गगनाला भिडले होते. परिणामी केंद्र सरकारला तूर डाळ आयात करावी लागली. तसेच तूर, चणा डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात छापेमारी करुन डाळ जप्त करावी लागली होती. सध्या दरवाढ सुरु आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये मिस्कीन यांना व्यापाऱ्यांना तूर डाळीची साठीबाजी न करण्याचे निर्देश दिले. या शिवाय डाळ खरेदीची किंमत आणि सामान्य ग्राहकांना विक्री करण्यात येणारी किंमत या दोन्ही किंमतीमधील तफावत कमी करण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनी या बैठकीत सकात्मक प्रतिसाद दिल्याचे मिस्कीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या बैठकीला व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी रामकिशोर सारडा, प्रभाकर मंत्री, सुरेश खांडरे, असमल शरीफ, हरी-इक्बाल अँड सन्स, मो. बुरानी, करीम हाजी अब्बास, सुरेश रोहना, शिवम हसानी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
किंमत फलक लावा
अनेक दुकानदार विविध दर्जाच्या डाळ व अन्य धान्य विक्रीसाठी दुकानात ठेवतात. परंतु त्यावर किंमत निदर्शक फलक लावत नाहीत. अधिक किंमतीचा माल विकला जावा, यासाठी कमी किंमतीच्या डाळीचा फलक लावत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मिस्कीन यांनी डाळीच्या पोत्यात किंमत दर्शविणारा फलक लावण्याचेही निर्देश दिले.