पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी अडचणीत
By admin | Published: August 24, 2014 11:23 PM2014-08-24T23:23:31+5:302014-08-24T23:23:31+5:30
पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील पंधरा दिवसापासून पावसाचा पत्ता नाही. तर, दुसरीकडे राजकीय नेते निवडणुकीच्या तयारीसाठी गावागावांत फिरताना दिसत आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते तर, ही वेळ नागरिकांवर आली नसली, असेही नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची टक्केवारी घटली आहे. सोयाबीन, कपास, तुर या पिकांची काही प्रमाणात पेरणी झाली असली तरी तालुक्यातील देवाडा खुर्द, पोंभूर्णा, घनोटी, उमरी पोतदार, डोंगरहळदी, जामतुकुम येथे केवळ ४० टक्के धान पिकांची रोवणी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठा फरत पडणारआहे.
रोवणी झाल्यापासून तब्बल २५ दिवसाचा कालावधी लोटूनही पाऊस पडल्या नाही. त्यामुळे परिसरातील पिके करपायला लागली आहे. सततच्या तापत्या उन्हामुळे पिके धोक्यात आली आहे.
मागील वर्षी सततच्या पावसाने उत्पादनात प्रचंड घट झाली तर काही ठिकाणी नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यावर्षी कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे पुरते कुंबरडे मोडले आहे. दरवर्षी होणाऱ्या या निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास हतबल झाला आहे. सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बँकेकडून खरीप कर्ज घेऊन शेतीची मशागत केली. बियाण, खताच्या वाढलेल्या किंमती, फवारणी व मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात करून पिके उभी केली. यात निसर्गाने साथ न दिल्याने हातातून पिक जात आहे.
तालुक्यामध्ये सिंचनाची सोय नसल्याने केवळ पुर्वजांनी तयार करून ठेवलेल्या बोळी व तलावाच्या भरोवशावर शेती केली जात आहे. तालुक्याला अंधारी, वैनगंगा नदीचे स्त्रोत आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या ठिकाणी सिंचन प्रकल्पाची सोय होवू शकली नाही. तालुका निर्मीतीला १५ वर्षाचा काळ लोटत आहे. मात्र येथील शेतकरी केवळ नैसर्गिक पावसावर अवलंबून शेती करीत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवित आहे. निवडून आल्यावर सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवित आहेत. कोरडे आश्वासन देण्यापेक्षा ते कृतीमध्ये आणून या मागासलेल्या आदिवासी बहुल तालुक्यात सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)