जाचक अटीमुळे योजनाच अडचणीत
By admin | Published: January 15, 2015 10:48 PM2015-01-15T22:48:46+5:302015-01-15T22:48:46+5:30
देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही.
ग्रामस्थांचा सवाल : गाव हागणदारीमुक्त होणार कसे ?
पेंढरी (कोके): देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही. या जाचक अटीमुळे चंद्रपूर जिल्हा हागणदारीमुक्त होणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन सुरु केले. त्याअंतर्गत गावागावात स्वच्छतेसोबतच शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले व मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात जे लाभार्थी बीपीएल, एपीएल, अल्पभुधारक आहेत, अशाच लोकांना शासनाच्या योजनेच्या निधीतून शौचालय बांधून मिळणार आहे. परंतु जे लाभार्थी यात मोडत नाहीत, त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांनी उघड्यावरच शौचास बसावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरटॅक्सपावती ऐवजी विद्युत बील, निवडणूक ओळखपत्र, जाबकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे शौचालय बांधण्यास चालणार नाही का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते अजब मानसिकतेमुळे शौचालय बांधण्यास तयार नाही. त्यामुळेदेखील स्वच्छतेचा फज्जा उडणार आहे व रोगांचा प्रादूर्भावसुद्धा होणार आहे. तसेच शौचालयाचे बील काढण्यास ग्रामपंचायत, संबंधित पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहे. सदर योजना चांगली असली तरी जाचक अट योजनेलाच मारक ठरत असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)