पट्टेधारकांना स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:02 AM2018-01-01T00:02:51+5:302018-01-01T00:03:13+5:30
झोपडपट्टी विकास संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा एक दिवसीय जनजागृती व स्थायी पट्ट्यांच्या संदर्भात मार्गदर्शन मेळावा भद्रावती येथे पार पडला.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : झोपडपट्टी विकास संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा एक दिवसीय जनजागृती व स्थायी पट्ट्यांच्या संदर्भात मार्गदर्शन मेळावा भद्रावती येथे पार पडला.
या मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोडे, मुख्याधिकारी विनोद जाधव, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सोनटक्के, सल्लागार चंद्रकांत खारकर, नगरसेवक प्रफुल गौरकार उपस्थित होते.
नगर परिषद हद्दीत एकूण १४ झोपडपट्ट्या आहेत. पट्ट्यांच्या संदर्भात त्यांचा सातत्याने लढा सुरू आहे. त्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे मिळालेच पाहिजे, या दृष्टीने कागदांच्या पूर्ततेसाठी न.प. भद्रावती व महसुल विभागाने सहकार्य करावे. लवकरात लवकर कागदाची पूर्तता करा, पट्टेधारकांना स्थायी पट्टे मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
नगर परिषद भद्रावती पट्टेधारकांसोबत आहे. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे मिळालेच पाहिजे, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले. याप्रसंगी तहसीलदार महेश शितोळे व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी मार्गदर्शन केले. २०११ पासून झोपडपट्टीवासीय पट्ट्यासाठी प्रयत्न करीत आहो, असे चंद्रकांत खारकर म्हणाले. संचालन पवन गौरकर, प्रास्ताविक राहुल सोनटक्के तर आभार नामेश्वर देवगडे यांनी मानले.