तीन दिवसांपासून नळयोजना बंद
By admin | Published: April 1, 2017 01:41 AM2017-04-01T01:41:35+5:302017-04-01T01:41:35+5:30
नदीपात्रात पाणी नसल्यामुळे नगरपंचायत हद्दीत असलेली नळयोजना मागील तीन दिवसांपासून बंद आहे.
पाण्यासाठी भटकंती : दूषित पाण्यावर भागवावी लागते तहान
सिंदेवाही : नदीपात्रात पाणी नसल्यामुळे नगरपंचायत हद्दीत असलेली नळयोजना मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. परिणामी ४२ अंश डिग्री तापमानात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सिंदेवाही शहरात तीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. तीनही टाक्याच्या माध्यमातून शहरातील १७ प्रभागात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाते. मात्र सद्या नळाद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने सिंदेवाहीकरांना घाणेरड्या पाण्याच्या माध्यमातून तहान भागवावी लागत आहे.
शहरातील नागरिकांना सरडपार या नदीतून पाणी दिल्या जाते. नदीच्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकासाठी नदीत हातबोर मारली आहे. नदीमधील पात्र व विहीरी कोरड्या झाल्याने मागील तीन दिवसापासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नगरपंचायत सदस्य व कर्मचारी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. पण जलकुंभात पाणीच नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा कुठून करायचा असा प्रश्न नगरपंचायत समोर पडला आहे. आजुबाजुच्या शेतकऱ्यांवर तहसिलदारांनी नोटीस देवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरपंचायतकडून करण्यात येत आहे.
शहरात पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यान नागरिकांना पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. अंतरावर असलेल्या व्हॉलवरून पाणी आणावे लागत आहे. तर काही महिला व्हॉलशेजारी खड्डयात जमा असलेल्या पाण्याद्वारे आपली तहान भागवत आहे.
इकडे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. तर शेतकरी उन्हाळी पीक वाचविण्यासाठी जलकुंभातुन बोरद्वारे पाणी देऊन पीक वाचवण्याची केविलवाणी धडपड करत आहे. मार्च महिन्यातच नदीचे पात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात भीषण पाणीटंचाई सामना सिंदेवाहीकरांना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने हालचाल करून पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी सिंदेवाहीतलील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)