प्रजासत्ताक दिनी चंद्रपुरात दुचाकीस्वार युवकांचा उच्छाद
By admin | Published: January 29, 2016 04:20 AM2016-01-29T04:20:31+5:302016-01-29T04:20:31+5:30
एकीकडे विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा
चंद्रपूर : एकीकडे विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांवर युवकांची काही टोळकी अक्षरश: उच्छाद घालीत होती. मोटारसायकलवरून वेगाने फिरणारे हे माथेफिरू युवक अश्लिल शिव्यांची लाखोळी वाहत होते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या महिला तरूणींसह सामान्य नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
चंद्रपूर शहरात दरवर्षीच १६ आॅगस्ट व २६ जानेवारीला असा प्रकार घडतो. परंतु पोलीस या युवकांविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याने सामान्यांमध्ये मात्र कमालिचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे राष्ट्रीय सणाला गालबोट लागत आहे. मंगळवारी पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनी असाच विभित्स प्रकार चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर पहावयास मिळाला. चंद्रपूर नागपूर मार्ग, पठाणपुरा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरून जाणारा मार्ग, जिल्हा स्टेडिअम मार्गावर सकाळी ८.३० वाजतापासून या युवकांचा राडा सुरू झाला. २५ ते ३० संख्येने मोटारसायकलवर असलेले हे युवक भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून वाह्यातपणाचे प्रदर्शन करीत होते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कुणी हटकल्यास त्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली जात होती. यात तरूणीही मागे नव्हत्या. युवकांच्या मोटारसायकलवर बसलेल्या या तरूणीदेखील युवकांना यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले.
१६ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. यानिमित्त सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असते. ज्या शहरात राज्याचे एक मंत्री आणि एक केंद्रिय राज्यमंत्री आहेत, त्यांच्याच शहरात राष्ट्रीय सणाच्या दिवशी उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार होऊनही पोलीस यंत्रणा मात्र हतबल असलेली दिसली. (प्रतिनिधी)
कुठे गेली पोलिसांची सतर्कता ?
गुन्ह्यांवर आळा बसावा, गुन्हा घडला तर गुन्हेगार सापडावेत, या हेतून चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अलिकडील काळात घडणाऱ्या दहतवादी हल्ल्याच्या घटना लक्षात घेता १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना असतात. असे असताना शहरात काही युवक उच्छाद घालतात आणि पोलीस त्यांना आवरू शकत नाहीत, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये खेद व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग तरी काय ?
राष्ट्रीय सणाच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यांवर काही विकृत युवक अशा पद्धतीने धुडगूस घालतात. हा प्रकार निश्चितपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या युवकांना आवर घालायचा असेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून या युवकांविरुद्ध कारवाई करावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.
२६ जानेवारीला असा प्रकार सुरू असल्याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. लगेच आम्ही वाहतूक पोलिसांनी तेथे पाठविले. परंतु त्यापूर्वीच युवकांचे टोळके तेथून पसार झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निश्चितपणे कारवाई केली जाईल.
-अशोक कोळी, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर.