मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 06:11 PM2022-03-12T18:11:00+5:302022-03-12T18:40:41+5:30

पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखवताच आरोपीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

two accused arrested in balharshah road accident case : they killed a friend and created drama which shows like an accident | मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत

मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकीसह चालक पुलावरून कोसळल्याचे प्रकरण अपघात नव्हे; तो तर ‘वेल प्लान मर्डर’ !

बल्लारपूर (चंद्रपूर) : गुरुवारच्या रात्री बामणी- राजुरा मार्गावरील पुलावरून मोटारसायकलसह चालक वर्धा नदीत कोसळल्याचे प्रकरण घडले होते. यात दुचाकीवर मागे बसलेला युवक पुलावरच पडल्याने बचावला होता. मात्र, हा प्रकार अपघात नसून कट रचून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पुलावर पडलेल्या युवकानेच हत्या केली व अपघात घडल्याचा बनाव केला. या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

रामेश्वर ऊर्फ लाल्या कालीचरण निषाद (वय ३८, रा. डॉ. आंबेडकर वाॅर्ड, बल्लारपूर) असे मृतकाचे नाव असून त्याचा मृतदेह पोलिसांनी वर्धा नदीपात्रातून बाहेर काढला आहे. सूरज हुबलाल सोनकर (२४, रा. डॉ. आंबेडकर वाॅर्ड) व अभिजित पांडे अशी आरोपींची नावे आहेत.

असा रचला कट

डॉ. आंबेडकर वॉर्डात राहणारा रामेश्वर ऊर्फ लाल्या कालीचरण निषाद हा आरोपी सूरजसह मजुरीचे काम करायचा. गुरुवारच्या रात्री त्याच वॉर्डात राहणारा सूरज हा त्याच्या घरी आला व त्याला फिरून येऊ म्हणून मोटारसायकलवर बसवून घेऊन गेला. नंतर रामेश्वरला त्याने दारू पाजली व राजुरा येथील रामूच्या ढाब्यावर जाऊन दोघांनी जेवण केले. त्या आधी रामेश्वरला आरोपीने पुन्हा दारू पाजली व त्याला घेऊन वर्धा नदीवर आला व आपल्या साथीदाराच्या सोबत मिळून त्याला नदीच्या पात्रात ढकलून हत्या केली. नंतर आरोपी पुलावर आला. त्यानंतर रात्री ९.५८ वाजता पोलिसांना ११२ नंबरवर फोन करून अपघात होऊन जोडीदार पुलावरून पडल्याचे सांगितले. आरोपीने पुलाजवळ असलेल्या फळविक्रेत्यांनाही गाडी पुलाखाली पडल्याचे सांगितले. या दरम्यान त्याचा साथीदार बेपत्ता झाला.

असे फुटले बिंग

आरोपीने केलेले हे नाटक जास्त काळ टिकले नाही. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरविली. आपल्या चमूसह रामूच्या ढाब्यावर गेले व तेथे सीसीटीव्ही फुटेज बघताच त्यांना संशय आला. जेवताना आरोपीचे वारंवार बाहेर जाणे, फोनवर बोलणे, आरोपीने ढाब्यावरून नदीवर येण्यास तब्बल एक तास लावला. तेव्हा पोलिसांनी आरोपी सूरजला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखवताच आरोपीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

दुसऱ्या आरोपीस करणवाडीतून अटक

घटनास्थळावरून फरार झालेला दुसरा आरोपी अभिजित पांडे याला सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, सतीश पाटील, शरद कुडे, संतोष दंडेलवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडी येथून शनिवारच्या पहाटे अटक केली. आरोपी सूरज सोनकर याने त्याला हत्येची सुपारी दिली होती. मात्र, ही हत्या का करण्यात आली, हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलीस आरोपींची चौकशी करीत आहेत.

Web Title: two accused arrested in balharshah road accident case : they killed a friend and created drama which shows like an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.