अडीच हजार जणांनी काढले घरबसल्या लायसन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:13+5:302021-08-14T04:33:13+5:30
चंद्रपूर : वाहन परवान्यासाठी नागरिकांची दलालांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या फेसलेस सेवेंतर्गत मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील २ ...
चंद्रपूर : वाहन परवान्यासाठी नागरिकांची दलालांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या फेसलेस सेवेंतर्गत मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील २ हजार २३८ जणांनी घरबसल्या लर्निंग लायसन्स काढले आहे. विशेष म्हणजे हे लायसन्स मिळविण्यासाठी अर्जदारांना एकदाही आरटीओ कार्यालयात जावे लागले नाही. आता सहा महिन्याच्या आत त्यांना परमानंट लायसन्स काढता येणार आहे.
वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालांकडून अतिरिक्त पैसे आकारले जातात. अशी नेहमी वाहनचालकांकडून ओरड व्हायची. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. वाहन ४.० या प्रणालीअंतर्गत आधारकार्डच्या आधारे घरपोच लर्निंग लायसन्स देण्यास १४ जूनपासून सुरुवात केली. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार ९४५ जणांनी लायसन्ससाठी अर्ज केले. जे अर्जदार ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झाले. संपूर्ण कागदपत्रे योग्य होती, अशा २ हजार ३३८ जणांना घरपोच लर्निंग लायसन्स देण्यात आले. सहा महिन्यांच्या आत या सर्वांना हे लायसन्स परमानंट करता येणार आहे.
बॉक्स
असा करा अर्ज
शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी परिवहन डॉट जीओव्ही डॉट ईन या संकेतस्थळावर शिकाऊ परवान्याचा पर्याय निवडावा. त्यानंतर आधारकर्ड नंबर टाकावा, आलेला ‘ओटीपी’ टाकावा. त्यानंतर सर्व माहिती बिनचूक भरावी. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा. त्यानंतर फोटो अॅन्ड सिग्नेचर’ अपलोड करून शुल्क भरायचे. त्यानंतर ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल. किमान ६० टक्के गुण मिळाल्यानंतर आपले शिकाऊ लायसन्स डाऊनलोड करून त्या ठिकाणी आपण त्याची छाायांकित प्रत काढू शकतो.
बॉक्स
१,९४३ अर्जात त्रुटी
सरल ४.० ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १० हजार ९४५ जणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत. मात्र त्यापैकी २ हजार २३८ जणांना लर्निंग लायसन्स मिळाले. परंतु, एक हजार ४३ जणांच्या अर्जात त्रुटी आहेत. काहींनी संपूर्ण कागदपत्रे जोडले नाही. त्यामुळे त्यांना लर्निंग लायसन्स मिळू शकले नाही.
बॉक्स
४६५ अर्ज कार्यालय स्तरावर प्रलंबित
१४ जून ते ८ ऑगस्ट या कालावधी ऑनलाईन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी १० हजार ९४५ जणांनी अर्ज केले. त्यापैकी ४६५ अर्ज कार्यालय स्तरावर प्रलंबित असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. पडताळणी झाल्यानंतर यांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वांनाही घरबसल्याच लर्निंग लायसन्स मिळणार आहे.
कोट
घरबसल्या लायसन्स काढण्याची फेसलेस प्रक्रिया अंत्यंत साधी आहे. १६ वर्षांवरील वाहनचालक या पद्धतीद्वारे लर्निंग लायसन्स काढू शकतात. आतापर्यंत सुमारे २ हजार २३८ जणांना लर्निंग लायसन्स देण्यात आले आहे. अनेक जण या पद्धतीने लायसन्स काढीत आहेत. ज्या नेटकॅफेमध्ये परिक्षार्थ्यांच्या जागी दुसऱ्याला बसवून परीक्षा देण्यात येत असल्याचे उघडकीस येईल, अशा नेटकॅफेचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर