ताडोबामध्ये मादी बिबटसोबत आढळले दोन काळे बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 08:08 PM2023-03-13T20:08:41+5:302023-03-13T20:09:24+5:30
Chandrapur News पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणखी एक कुतुहलाची घटना पुढे आली आहे. एका मादी बिबट्यासोबत दोन बछडे आढळले. विशेष म्हणजे, हे दोन्ही बछडे काळ्या रंगाचे आहे.
चंद्रपूर : पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणखी एक कुतुहलाची घटना पुढे आली आहे. एका मादी बिबट्यासोबत दोन बछडे आढळले. विशेष म्हणजे, हे दोन्ही बछडे काळ्या रंगाचे आहे.
ही बाब काही पर्यटकांना ताडोबाच्या मदनापूर गेट परिसरात रविवारी सकाळी प्रत्यक्ष बघायला मिळाली. त्यांनी बिबट आणि काळ्या रंगाच्या दोन बछड्यांचा व्हिडिओदेखील व्हायरल केला आहे. काळ्या बिबट्यानंतर काळे बछडे पर्यटकांसाठी नवी पर्वणीच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.मागील सुमारे चार वर्षांपूर्वी ताडोबामध्ये एक काळा बिबट आढळला होता. या बिबट्याचा कोळसा गेट परिसरात वावर होता. त्यानंतर तो ताडोबातील अन्य परिसरातही पर्यटकांना दिसत होता. हा बिबट नर होता. त्याचे अन्य मादी बिबटसोबत समागम होऊन त्यांच्यापासून हे काळे बछडे जन्माला आले असावे, असा अंदाज आहे. हे बछडे नर वा मादी हे मात्र कळू शकले नाही. परंतु या काळ्या बछड्यांमुळे भविष्यात ताडोबात काळ्या बिबट्याची संख्या वाढण्याची शक्यताही काही पर्यटक वर्तवित आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काही पर्यटक मदनापूर गेट परिसरातून सफारीला गेले होते. दरम्यान, त्यांना बिबट मादी आणि तिच्या दोन काळ्या बछड्यांचे दर्शन झाले. व्हिडिओत घनदाट जंगलातून एक बिबट बाहेर येते. त्यानंतर त्या बिबट्याच्या मागे एक काळा बछडा धावत येतो. हे दोघेही दुसऱ्या झुडुपात जात नाही तोच त्यांच्या मागून पुन्हा एक काळा बछडा धावत येत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ताडोबामध्ये असलेला एकमेव काळा बिबट पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. आता हे काळे बछडेही पर्यटकांना भुरळ घालणार असल्याचे बोलले जात आहे.