गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैलांचा होरपळून मृत्यू
By admin | Published: November 25, 2015 03:31 AM2015-11-25T03:31:19+5:302015-11-25T03:31:19+5:30
फटाक्याच्या ठिणगीचे गोठ्याला आग लागली. या आगीत दोन बैलांसह, दोन बकऱ्या व साहित्य जळून खाक झाल्याची
नवरगाव : फटाक्याच्या ठिणगीचे गोठ्याला आग लागली. या आगीत दोन बैलांसह, दोन बकऱ्या व साहित्य जळून खाक झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे सोमवारच्या रात्री घडली.
या घटनेत १६ लाख ४७ हजार ७१३ रुपयांचे आर्थिक नुकसान असून रात्री लागलेली आग सकाळीही धगधगत होती. २३ नोव्हेंबरला तुळशीच्या लग्नाचा पहिला दिवस होता. गोठ्या शेजारच्या घरी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास तुळशीचे लग्न लावण्यात आले. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. त्यानंतर जेवण करुन आजुबाजुचे सर्व झोपी गेले.
फटाक्याची ठिणगी गोठ्यावरील टिनावर वाळवायला टाकलेल्या धानाच्या लोंबावर पडली. त्या ठिणगीचे रुपांतर मोठ्या आगीत झाले आणि गोठ्याला आग लागली. ही आग देवीदास कोठेवार यांच्या लक्षात आल्यानंतर स्वत:च्या गोठ्यातील जनावरांचे दोर कापून बाहेर काढले. आणि इतरांना जागे केले.
गोठ्यामध्ये बैलांसाठी तणस, कुटार व लाकुड फाटा मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. तरीही काही नागरिकांनी गोठ्यात असलेली ट्रॅक्टर व काही जनावरे दोर कापून बाहेर काढली. मात्र एक बैल जोडी, दोन शेळ्या जळून त्यांची घटनास्थळीच राख झाली. तर आठ ते दहा जनावरे जखमी झाले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, विनोद बोरकर, देविदास कोडेवार यांच्या मालकीचे ते गोठे होते. आग विझविण्यासाठी पाच-सहा मोटारपंप व टँकर लावण्यात आले. मंडळ अधिकारी कुंभरे, तलाठी प्रकाश पाटील तर वनविभागाचे क्षेत्रसहाय्यक के.एल. उईके, वनरक्षक आर.यु. शेख, सरपंच सदाशिव मेश्राम, पोलीस पाटील नरेंद्र गहाणे यांनी पंचनामा केला. यामध्ये राजेंद्र बोरकर यांचे १४ लाख ९९२ रुपयाचे, विनोद बोरकर यांचे २ लाख ४६ हजार ५५६ रुपयांचे तर देविदास कोेडेवार यांचे ६५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. (वार्ताहर)