चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेखाली येऊन वाघाचे तीन बछडे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:19 IST2018-11-15T10:45:16+5:302018-11-15T16:19:52+5:30
जुनोना जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाचे दोन बछडे ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले.

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेखाली येऊन वाघाचे तीन बछडे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जुनोना जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाचे दोन बछडे ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. चांदा फोर्टकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीखाली ही घटना घडली. ही गाडी सकाळी चंद्रपूरहून सहा वाजता निघते. ती जुनोना या परिसरातील घनदाट जंगलातून जाते. पहाटेच्या वेळेस रेल्वे रुळावर आलेल्या या बछड्यांचा या गाडीखाली येऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जातो आहे. हा अपघात एफडीसएमच्या वनपरिक्षेत्रातील आहे. याआधी बिबट, अस्वलाची पिल्ले रेल्वेखाली ठार झाली आहेत.
चंद्रपूर गोंदिया या रेल्वेगाडीच्या चालकाला रेल्वे ट्रॅकवर पडलेले दोन बछडे दिसले होते. मात्र गाडीचा वेग अधिक असल्याने तो नियंत्रित करणे अवघड होते. परिणामी त्याने पुढील स्टेशनवर या घटनेची नोंद केली. मध्यरात्री गेलेल्या एखाद्या गाडीखाली हे बछडे आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, रेल्वे रुळावर एका बछड्याचा पाय आढळून आला. तो पाय रेल्वे रुळावरील दोन्ही बछड्यांचा नसल्याने तिसरा बछडा असावा असा कयास बांधून जवळपास शोध घेण्यात आला. त्यात रेल्वे रुळाच्या बाजूला तिसराही बछडा मृतावस्थेत आढळला.