दोन कोटींची दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:07 AM2019-08-22T01:07:37+5:302019-08-22T01:08:01+5:30
दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील पोलीस विभागाने मंगळवारी आणि बुधवारी एक कोटी ९४ लाख ८८ हजार १५० रुपये किमतीची देशी व विदेशी कंपनीची दारू नष्ट केली. ही दारू नष्ट करण्यासाठी दोन दिवस लागले.
२०१७ -१८ या दोन वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी तहसील कार्यालयाजवळील बसस्टँडवर तर बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात ही दारू नष्ट करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार ही दारू २०१७ - १८ या वर्षांमधील १४० गुन्ह्यांतील आहे. यात देशी दारूच्या ९० मिलीच्या एक लाख ९०० बॉटल, १८० मिलीच्या २ हजार ६८५ बॉटल , विदेशी कंपनीच्या १८० मिलीच्या ४३ हजार ८२१ बॉटल, ९० मिलीच्या ६९ बॉटल तर बिअरच्या ८६ बॉटलचा समावेश आहे. ही कारवाई ठाणेदार राहूल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन. के. सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. नागभीड तालुका नागपूर व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने नागभीड हे अवैध दारू वाहतुकीचे प्रवेशद्वार झाल्याचे दिसते. पोलिसांकडून शेकडो कारवाया आजवर करण्यात आल्या आहेत.