वाघीण, बिबट्यासह दोन बछडे सापडले; वाघ मात्र मोकाटच
By परिमल डोहणे | Published: May 28, 2023 11:26 PM2023-05-28T23:26:54+5:302023-05-28T23:28:56+5:30
मागील काही दिवसांपासून सावली परिसरात वाघाने मोठा धुमाकूळ माजवला होता. अनेक वन्यप्राण्यांसह काही नागरिकांचाही बळी घेतला होता. परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती.
चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रात सात हजारांपेक्षा अधिक जागेवर वनव्याप्त असलेल्या व्याहाड (खुर्द) उपवन कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांत वाघ व बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. दरम्यान, वन विभागाने नरभक्षी वाघीण व बिबट्यासह दोन बछड्यांना जेरबंद केले. मात्र, वाघोली बुटी, सामदा परिसरात असलेला वाघ वन विभागाला हुलकावणी देत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
मागील काही दिवसांपासून सावली परिसरात वाघाने मोठा धुमाकूळ माजवला होता. अनेक वन्यप्राण्यांसह काही नागरिकांचाही बळी घेतला होता. परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. दरम्यान, २१ मे रोजी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रुढे यांच्या फार्महाउस परिसरात दडून असलेली मादी बिबट व दोन बछडे व २७ मे रोजी व्याहाड (खुर्द) येथील केरोडा मार्गावरील नर्सरीमध्ये वाघीण पकडण्यात वन विभागाला यश आले होते. याहूनही वाघोली बुटी, सामदा परिसरातील वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने २१ मे पासून वैनगंगा नदीकाठावरील शेत परिसरात अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले आहेत.
व्याहाड जंगल परिसरात व नदीकाठावरील लावलेल्या कॅमेऱ्यात वाघ चित्रित झाला आहे. त्यामुळे या परिसरात वाघाचा संचार असल्याचे वन विभागाच्या लक्षात आले आहे. दोन, ते तीन दिवसांपासून २८ मे रोजी वाघोली सामदा परिसरातील दागोबा देवस्थानकडे वाघ फिरत असल्याचे सामदा येथील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात बघितले असल्याने भीती निर्माण झाली आहे. या वाघाचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
शेतावर जायचे कसे?
सावली तालुक्यात जेरबंद झालेल्या वाघिणीने चार जणांचा बळी घेतला होता. त्यासह काही जनावरांचाही फडशा पाडला होता. खरीप हंगाम जवळ आल्याने हंगामपूर्व कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जात आहेत; परंतु या परिसरात वाघाचा संचार असल्याने शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
वाघोली बुट्टी सामदा परिसरात लोकांच्या माहितीनुसार वाघ फिरत असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने त्या परिसरात ६० पेक्षा अधिक कॅमेरे लावले आहेत. रोज कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर सहा लाइव्ह कॅमेरे लावले आहेत. त्याद्वारे मी स्वत: ऑफिसमधूनच त्या परिसरातील हालचाली बघू शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ३० वनकर्मचारी गस्तीवर आहेत. कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्यानंतर पुढची योजना आखता येईल.
-प्रवीण विरुटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली