दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर
By राजेश भोजेकर | Published: May 22, 2024 10:52 AM2024-05-22T10:52:01+5:302024-05-22T10:52:38+5:30
भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील घटना
राजेश भोजेकर, चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे राहणाऱ्या दोघांचा दारू सोडण्याची औषध खाल्ल्याने मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) राहणार गुडगाव असे मृतकांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दारुने व्यसनाधीन झालेले गुडगाव येथील चार जण जाम जवळील शेडगाव जि. वर्धा येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी दि.२१ मे रोजी सकाळी नऊ वाजता गेले होते. तिथे महाराजांनी दारू सोडण्याची औषध दिली. त्यानंतर ते सायंकाळी सहाच्या दरम्यान आपल्या गावी गुडगाव येथे परत आले. त्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यामध्ये सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती भद्रावतीचे ठाणेदार विपिन इंगळे यांना होताच दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात येथे आणण्यात आले. ज्या औषधीमुळे दोघांचा जीव गेला याचा तपास करून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांनी भेट दिली.