रोजगार सेवक निवडीवरून दोन गटात शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:27 PM2018-06-20T22:27:44+5:302018-06-20T22:27:57+5:30
तीन महिन्यांपूर्वी सोनापूर (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार सेवक पदावरुन दामोधर कावळे यांना ग्रामसभेने निलंबीत केले होते. त्यानंतर नवीन रोजगार सेवक नियुक्त करण्याकरिता बुधवारी सोनापूर (बु.) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र निवडीच्या वादावरुन पुन्हा उपस्थितांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : तीन महिन्यांपूर्वी सोनापूर (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार सेवक पदावरुन दामोधर कावळे यांना ग्रामसभेने निलंबीत केले होते. त्यानंतर नवीन रोजगार सेवक नियुक्त करण्याकरिता बुधवारी सोनापूर (बु.) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र निवडीच्या वादावरुन पुन्हा उपस्थितांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.
रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याच्या उद्देशाने सत्ताधारी व विरोधक आपआपल्या समर्थकाला ग्रामसभेमध्ये बोलविले होते. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्ष म्हणून गणेश शंकर भरडे यांची नियुक्ती करण्यात आली. रोजगार सेवक पदाकरिता ग्रामसभेतून ११ लोकांची नावे सुचविण्यात आली. त्यात गुरुदेव शेंडे, अमृत तुरारे, सुधीर ठोंबरे, जगदीश खेत्रे, विष्णूदास गुरुनुले, कृष्णा गमणे, शेखर खामदेवे, रक्षा नागापुरे, दामोधर कावळे, भारत डोंगरे व कारू हजारे यांची नावे होती. पदावरुन हटविण्यात आलेले दामोधर कावळे यांचेही नाव पुन्हा आल्याने ते कमी करण्यावरून दोन गटामध्ये शाब्दीक चकमक उडाली. वाद शिगेला जात असल्याचे पाहुन सरपंच शिला ठोंबरे व ग्रामविकास अधिकारी यांनी पोलिसांना पाचारण केले. अखेर दोन्ही गटाकडून एकमेकांचे उमेदवार मागे न घेतल्याने अध्यक्षांनी आपले समर्थक एका बाजुला करण्याचा सल्ला दिला. तत्कालीन रोजगार सेवक दामोधर कावळे यांच्या बाजूने सदस्य संख्या जास्त असल्यामुळे सत्ताधारी गटाकडून त्याला विरोध करून ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती असतानाही ग्रामसभा गुंडाळण्यात आल्याने सोनापूर (बु.) व सारगंडवासीय नागरिकांना नव्या रोजगार सेवकाच्या नियुक्तीला मुकावे लागले. त्यामुळे मजुर वर्गात निराशेचे वातावरण पहायला मिळाले.