नव्या दुचाकीसोबत दोन हेल्मेट अनिवार्य, शासनाचे आरटीओंना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:30 PM2019-06-13T13:30:03+5:302019-06-13T13:34:01+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे शासनाने आता खरी नस ओळखली आहे.
चंद्रपूर : न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे शासनाने आता खरी नस ओळखली आहे. वाहन विक्रेत्यांनी दुचाकी विकताना सोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा वाहनाची आरटीओत नोंदच केली जाणार नसल्याचे निर्देश राज्य शासनाने राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहन विक्रेत्यांना पत्र पाठवून दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे बजावले आहेत. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने व कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकी वाहन उत्पादकांच्या सर्व विक्रेत्यांना दुचाकी वाहन विक्री करतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याविषयी निर्देशित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याबाबत अवगतही केले आहे. विक्रेत्याने दोन हेल्मेट पुरविण्यात आले याबाबतचे पत्र जोडून वाहनाची नोंदणी करावी. याचे उल्लंघन झाल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १३८ च्या उपनियम ४ एफ प्रमाणे कार्यवाही करण्याची तंबीही दिलेली आहे. शिवाय दुचाकी वाहनांची नोंदणी केल्या जाणार नसल्याचे वाहन विक्रेत्यांना बजावले आहे.
दुचाकी वाहनांना होणाऱ्या अपघातात जीव जाण्यामागे हेल्मेट नसणे हे महत्त्वाचे कारण पुढे आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता ही बाब अनेकवार पुढे आली आहे. यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्यामुळे शासनाने नवीन पद्धत अवलंबिली आहे. दुचाकी विक्रेत्यांनी वाहन खरेदीदारास दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.
दुचाकीस्वारांना होत असलेल्या अपघातात बहुतांशवेळी हेल्मेट नसल्यामुळे जीव जातो. दोन वाहनांची धडक झाल्यास डोक्याला मार लागण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहन घसरून पडले तरी डोक्याला मार लागून जीव जात असल्याच्या घटना घडत आहे. यावर नियंत्रण आणून जीव वाचविण्यासाठी प्रत्येक दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. वाहन विक्रेत्यांनी वाहन खरेदीदारास दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. अन्यथा वाहनाची नोंदच केली जाणार नाही, असे निर्देश आहेत.
- विश्वांभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.