दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 04:16 PM2021-12-23T16:16:56+5:302021-12-23T16:48:52+5:30
मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली.
चंद्रपूर : चंद्रपूर एमआयडीसी परिसरात दुचाकी-बोलेरोमध्ये जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर एमआयडीसी परिसरात बुधवार ( ता.२२) सायंकाळी ६ वाजता घडली.
सुधाकर लक्ष्मण धोटे (वय ४३) व मनोज गणपती जुनघरे ( वय ४७) रा. विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ते दोघेही जीवलग मित्र असून नेहमीच सोबत असायचे. दोघेही बिल्ट ग्राफिक्स पेपर मिलमध्ये नोकरीला होते. विसापूर येथील मनोज जुनघरे यांच्या भाचीचे २६ डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. त्यानिमित्त मनोज मित्र सुधाकर धोटे सोबत बहिणीच्या घरी गेले होते.
दोघेही एम. एच.३४-बी. क्यू.०४१३ या दुचाकी ने वणी जि. यवतमाळ येथे भाचीच्या लग्न कार्यानिमित्त देव पोहचविण्यासाठी गेले होते. तेथील ख्याली खुशाली विचारून घुगुस मार्गाने विसापूरकडे येत होते. दरम्यान एमआयडीसी परिसरात मल्टी ऑर्गॅनिक कपंनीजवळील वळणावर बोलेरो वाहन क्रमांक एम. एच.३४-एम.२५४४ ने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर धोटे जागीच ठार झाले तर मनोज जुनघरे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनोज जुनघरे हा सामाजिक कार्यकर्ता असून ओबीसी महासंघाचे सदस्य म्हणून सक्रिय होते. त्यांनी भाचीच्या लग्नाला चांगला बेत आखला होता. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. ओबीसी महासंघाच्या चळवळीतील धडाडीचा कार्यकर्ता अचानक निघून गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. विसापूर गावात दोघांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.