चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू; तर तीन महिला जखमी
By परिमल डोहणे | Published: September 11, 2022 06:49 PM2022-09-11T18:49:09+5:302022-09-11T18:49:17+5:30
शेतात काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तर तीन महिला जखमी झाल्याची घटना सावली आणि ब्रह्मपुरी तालुक्यात घडली.
चंद्रपूर : शेतात काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तर तीन महिला जखमी झाल्याची घटना सावली आणि ब्रह्मपुरी तालुक्यात घडली. सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशनांतर्गत कसरगाव येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत दिवाकर उर्फ शरद पंढरी मुनघाटे (वय ४५, रा.गेवरा खुर्द) यांचा मृत्यू झाला. शेवंताबाई देशमुख (६०) या जखमी झाल्या, तर ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव शिवारात रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत श्यामल लोढे (५२) रा. आवळगाव यांचा मृत्यू झाला, तर ज्याेती नीलेश पाेहनकर (२५), अश्विनी सुधीर नरुले (४०) या दाेन महिला जखमी झाल्या आहेत.
सावली तालुक्यातील कसरगाव परिसरात निंदनाचे काम सुरू आहे. रविवारी सकाळी दिवाकर आपली पत्नी कल्पना मुनघाटे, आत्या शेवंताबाई देशमुख व गावातील कुसुम नरुले, मुक्ता कुकुडकर यांच्यासह शेतीतील निंदनाचे काम करण्यास गेला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अशातच शेतात काम करणाऱ्या दिवाकरच्या अंगावर वीज कोसळली. त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या शेजारी असलेल्या शेवंताबाई देशमुख या किरकोळ जखमी झाल्या. याबाबतची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून, शवविच्छेदनाकरिता सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड करीत आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे अश्विनी सुधीर नरुले ही महिला सात ते आठ महिलांसाेबत शेतावर निंदन करण्यासाठी गेली होती. निंदन सुरू असताना दुपारी तीन वाजता न्याहारी करण्यासाठी शेतातील एका झाडाखाली बसल्या असताना अचानक पाऊस सुरू झाला अन् अचानक त्या झाडावर वीज काेसळली. यामध्ये श्यामल लाेढे ही महिला जागीच ठार झाली, तर ज्याेती पाेहनकर व अश्विनी नरुले या दाेन महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना तत्काळ सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मेंढकी पाेलिसांना देण्यात आली.