वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 10:42 AM2022-04-20T10:42:33+5:302022-04-20T10:46:10+5:30
दोन ते तीन वर्षांनंतर गावात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
राकेश बोरकुंडवार
सिंदेवाही (चंद्रपूर) : तालुक्यातील सरडपार आणि पवनपार येथे वाघ आणि बिबट्याने हल्ला केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सरडपार (चक) येथे अंगणात झोपलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला, तर पवनपार येथे मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने झडप घालून ठार केले. एकाच दिवशी सकाळी दोन घटना घडल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शालिक बुधाजी नन्नावरे (वय ७२) आणि सुरेश रामजी लोनबले (५०) अशी मृतकांची नावे आहेत.
सरडपार (चक) येथील शालिक बुधाजी नन्नावरे हे आपल्या घरासमोरील अंगणात झोपले होते. दरम्यान, पहाटे तीन वाजताच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना काही अंतरापर्यंत उचलून नेले. कुटुंबीयांच्या लक्षात येताच शोधाशोध केली असता काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. मागील दोन ते तीन वर्षांनंतर गावात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर घटनास्थळी अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालात मृतदेह पाठविण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवारी कक्ष क्रमांक २८२ मध्ये मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या सुरेश रामजी लोनबले यांच्यावर वाघाने सकाळी ९ वाजताच्या सुमारास हल्ला केला. आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत माहिती होताच आरडाओरड केली. त्यानंतर वाघ पळून गेला. मात्र, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकारी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही येथे पाठविण्यात आला. एकाच दिवशी तालुक्यात दोन घटना घडल्यामुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. दोन्ही घटनास्थळी वनविभागाचे सहायक वनरक्षक आर. एन. चोपडे, सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. वनविभागाने दोन्ही मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत केली. या घटनेतील वाघ तसेच बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. दरम्यान, वनविभागाने घटनेच्या दोन्ही परिसरात सर्च मोहीम राबविली असून काही कॅमेरेसुद्धा लावले आहेत.
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
शेळ्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला चढवित जखमी केले. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरीच्या कोसंबी खडसमारा जंगल परिसरातील कोसंबी ते आक्सापूर मार्गावरील नाल्याजवळ घडली. गिरीधर जैराम मोहुर्ले (५५) असे जखमी गुराख्याचे नाव आहे. गिरीधर मोहुर्ले सायंकाळी परतत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. घटनेत त्यांचे हात व कमरेला किरकोळ जखमा झाल्या. घटनेची माहिती आवळगावचे वनक्षेत्र सहायक ए. पी. करंडे यांनी कोसंबी खळसमारा येथे जाऊन जखमीला गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले.