जिल्ह्यात विविध अपघातात दोन ठार
By admin | Published: September 19, 2015 01:13 AM2015-09-19T01:13:59+5:302015-09-19T01:13:59+5:30
जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोनजण जखमी झालेत.
ब्रह्मपुरी/विरूर (स्टे) : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोनजण जखमी झालेत.
तेलंगणा प्रदेश सिमेलगत असलेल्या वाकडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात नंदीप्पा मंडल आसिफाबाद येथील भिमराव गोतरे (३५) हा जागीच ठार झाला तर राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील राकेश बंडू खोब्रागडे (२६) याचा उपचारादरम्यान नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
विरूर येथील राकेश बंडू खोब्रागडे हा तेलंगणा येथील झेंडीगुडा येथे सासरवाडीला गेला होता. परत येताना तेलंगणातील वाकडी गावालगत राज्यमार्ग असलेल्या पेट्रोल पंपजवळ पेट्रोल भरण्याकरिता आलेल्या भीमराव गोतरे यांची दुचाकी व विरूद्ध दिशेने येणाऱ्या राकेश खोब्रागडे याची दुचाकी या दोन वाहनात टक्कर झाली. त्यात भिमराव गोतरे (३५) याचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बंडू खोब्रागडे याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
ब्रह्मपुरी तालुक्यातील नागभीड - ब्रह्मपुरी राज्य मार्गावर सायगाटा फाटा ते अली राईस मिलपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीस्वारासह दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. विनायक हरी कोरे (४२) रा. मेंढा हा किरकोळ जखमी असून पाहुणा म्हणून आलेला दीपक दुधराम शिवणकर (३५) रा. ब्राह्मणटोला (ता. अर्जुनी) हा गंभीर जखमी झालेला आहे.
मेंढा (किरमिटी) या राहत्या गावावरून हे दोघे दुचाकीने ब्रह्मपुरीला येत असताना दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या सुचना फलकावर जाऊन आदळल्याने विनायक हरी कोरे व दीपक दुधराम शिवणकर हे दोघे जखमी झाले. दीपक शिवणकर याला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक अपघात घडत असूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी/ वार्ताहर)