बल्लारपुरातील वाॅर्डात शिरले दोन बिबटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:17+5:302021-03-08T04:27:17+5:30
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : वनखात्याने लावले आवाजाचे सेंसर बल्लारपूर : सहा दिवसांपूर्वी टेकडी विभागातील पंडित विवेकानंद वॉर्डातील ...
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : वनखात्याने लावले आवाजाचे सेंसर
बल्लारपूर : सहा दिवसांपूर्वी टेकडी विभागातील पंडित विवेकानंद वॉर्डातील एका घरात शिरून बिबट्याने दोन बकऱ्या फस्त केल्यानंतर आता त्याने रोज वॉर्डात हजेरी लावणे सुरू केले आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता दोन बिबटे आले व धुमाकूळ घालून जंगलात गेले व पुन्हा आले. नागरिकांनी रात्री ११ वाजेपर्यंत फटाके फोडून बिबट्यांना पळविले. याची सूचना वनखात्यास देण्यात आली आहे.
बिबट्याने पंडित विवेकानंद वॉर्डातील अनिल राजभर यांच्या दोन बकऱ्या फस्त केल्यानंतर बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी त्यांच्या घरी जनावर आल्याचा आवाज पकडणारी सेंसर मशीन लावली आहे, जी ३० मीटरपर्यंत वन्यप्राणी आल्यास आवाज करू लागते. शनिवारी रात्री दोन बिबटे आल्यामुळे त्या सेंसर मशीनने जोरदार आवाज केला व तेथील लोकांनीही दोन बिबटे आल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी फटाके फोडून बिबट्यास पळविले. वन विभागाने जी भिंत बांधली, त्याला भगदाड पडल्यामुळे वन्यप्राणी त्या मार्गाने येतात. ते त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे. रोज बिबटे येऊन वॉर्डातील डुकराची शिकार करीत आहेत. बिबट्यांचा वावर कसा बंद होणार यावर वनखात्याने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.