कौतुकास्पद! 'त्या' दोन बालिकांच्या समय सूचकतेने वाचवले श्वानाच्या ११ पिल्लांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 03:38 PM2022-08-31T15:38:48+5:302022-08-31T15:51:12+5:30
बल्लारपुरातील घटना : पिल्ली बाहेर काढल्यानंतर चालला बुलडोजर
मंगल जीवने
बल्लारपूर (चंद्रपूर) : मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच प्राण्यांची जास्त आवड असते. प्रसंगी त्यांच्या जीवाची काळजी घेण्यात मुलेच धाडस दाखवू शकतात, हे शहरातील ऋतुजा व कुंजल या दोन बालिकांनी श्वानाच्या ११ पिलांचे प्राण वाचवून सिद्ध केले.
त्याचे असे झाले की, शहरातील बालाजी वाॅर्डात एका जीर्ण घराला बुलडोजरने पाडायचे काम सुरू होते. श्वानाने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिलाय, याची घर मालकाला माहितीच नव्हती. श्वान घराच्या बाहेर तर पिल्ले घरात अडकली. मात्र, तिला घरात जाता येत नसल्याने टाहो फोडत होती. घराशेजारी राहणाऱ्या मुलींना ते माहीत होते. त्यांनी श्वानाचे ओरडणे ऐकले. त्यांच्या लक्षात आले की, पिलांची आई कशासाठी ओरडत आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता ऋतुजा नावाच्या बालिकेने तिचे बाबा श्रीकांत दवणे यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच ते धावून घरी आले. घर पाडणाऱ्या बुलडोजरला थांबवून घराच्या बोगद्यात असलेली ११ गोजिरवाणे पिल्ली मुलींच्या मदतीने बाहेर काढली. त्यांना आपल्या घरी आश्रय दिला. त्या पिलांची आई लाडाने कुरवाळत होती. या घटनेने त्या दोन्ही मुलींचे वॉर्डातील नागरिकांनी कौतुक केले.
शहरात प्राणी मित्रांची गरज
बल्लारपुरात मागील काही वर्षांपासून मोकाट श्वान व अन्य पाळीव प्राण्यांची संख्या वाढली. प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांचा हाकनाक बळी जातो. अशावेळी प्राणी मित्रांची गरज भासू लागली आहे.