आकाशातून पडले धातूचे दोन गोळे, चंद्रपूरचे खगोल अभ्यासक म्हणतात, सॅटेलाईटचे अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:42 AM2022-04-04T07:42:12+5:302022-04-04T07:42:40+5:30
Chandrapur News: सिंदेवाही तालुक्यापासून तीन किमी अंतरावरील लाडबोरी व १५ किमी अंतरावरील पवनपार येथील परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या.
- संदीप बांगडे
चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यापासून तीन किमी अंतरावरील लाडबोरी व १५ किमी अंतरावरील पवनपार येथील परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या. या गोलाकार वस्तू सिलिंडर असाव्यात, असे मानले जात आहे. एका सॅटेलाईटचे हे अवशेष असल्याची माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे व प्रा. योगेश दुधपचारे यांनी दिली.
शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात आकाशातून काही लाल रंगाच्या वस्तू पृथ्वीकडे वेगाने येत असल्याचे नागरिकांना दिसले. अनेकांनी याचे चित्रीकरणही केले. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे संदेश तुकाराम माळवे यांच्या घराशेजारी एक भलीमोठी धातूची तप्त रिंग कोसळली. सुमारे आठ फुटांची ही रिंग आहे.
रविवारी सकाळी पवनपार येथील विजय वाढई, महादेव वाढई हे मोहफूल गोळा करण्याकरिता जात असताना त्यांना धातूची गोलाकार सिलिंडरसदृश वस्तू जमिनीवर पडल्याचे दिसले. शनिवारच्या घटनेमुळे नागरिक आधीच सतर्क होते. या वस्तूला कुणीही हात लावला नाही. तालुक्यातीलच मरेगाव येथे असेच सिलिंडर मोकळ्या जागेत पडून असल्याचे दिसले. पोलिसांनी अवकाशातून पडलेल्या वस्तू सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जमा केल्या. हे दोन्ही सिलिंडर सारखेच असून, अंदाजे आठ किलो वजनाचे आहेत.
निरीक्षणासाठी खगोल शास्त्रज्ञ आज येणार
खगोलीय दृष्टिकोनातून ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या घटनेचा अभ्यास व पडलेल्या अवशेषाचे करण्याकरिता खगोल शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्यासह हे शास्त्रज्ञ सोमवारी सिंदेवाही ठाण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी ‘लोकमत’ला दिली.