दोन हजार अंगणवाडी सेविका, सहा पुरूषांना अटक व सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:40 PM2017-10-02T23:40:34+5:302017-10-02T23:40:52+5:30
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी गेल्या ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी गेल्या ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. शासनाने संपाची दखल घेत नाममात्र दीड हजार रूपयाची मानधन वाढ केली. मात्र ही मानधन वाढ आम्हाला मान्य नाही, किमान पाच हजार रूपये मानधन वाढ द्या, या मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी चंद्रपुरात सोमवारी जेलभरो आंदोलन केले. यात जवळपास दोन हजार महिला व सहा पुरूषांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी कमिटीचे गठन करण्यात आले. मात्र कमिटीच्या प्रस्तावाला शासनाने केराची टोपली दाखवली आहे. या फसवणुकीच्या निषेधार्थ अंगणवाडी कृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. राज्यभरातील २ लाख ६ हजार अंगणवाडी सेविका या संपात सहभागी झाल्या असून चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यातील संतप्त अंगणवाडी सेविकांनी सोमवारी संघटनेचे नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले व स्वत:ला अटक करून घेतली. दुपारी १२ वाजता गांधी चौकातून मोर्चा सुरूवात झाली. काँग्रेसचे नेते राहुल पुगलिया, शिवसेनेचे आ. बाळु धानोरकर, किशोर जोरगेवार यांनीही मोर्चासमोर येऊन पाठिंबा दिला. भाजप शासनाचा धिक्कार असो, शासनाची दडपशाही हानुन पाडा, फसव्या घोषणा देणे बंद करा, मानधन वाढ झालीच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा जिल्हा परिषदेसमोर धडकला. यावेळी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जवळपास दोन हजार अंगणवाडी सेविका व ६ पुरूषांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.