दाेन हजार किमी गेली वाघोबाची स्वारी... कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 06:47 AM2023-11-25T06:47:09+5:302023-11-25T06:47:31+5:30
चार राज्यांतून रस्ते-नद्या-गावं ओलांडत अडथळ्यांचा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील ताडोबाच्या लँडस्केपमधील एका नर वाघाने चार राज्यांची जंगले पार करीत सुमारे दोन हजार किमी प्रवास केल्याचे समोर आले आहे. ओडिशाच्या जंगलात हा वाघ दिसल्याची माहिती एका वन अधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला. सुरक्षित प्रदेश व जोडीदाराच्या शोधात या वाघाचे स्थलांतर झाल्याचा अंदाज आहे.
या वाघाला रेडिओ-कॉलर नव्हता; पट्ट्यांच्या पॅटर्नवरून तो ताडोबातील असल्याची ओळख पटली.
वाघ ताडोबातून सिंदेवाही तालुक्यात आला असावा व येथून त्याने ओडिसा गाठलेले आहे. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट डेहराडून यांनी या वाघाची पुष्टी केलेली आहे.
- दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी.
अशी पटली ओळख
nवाघाने सप्टेंबरमध्ये गजपती भागात पशुधनाची शिकार केली. त्यानंतर तेथे कॅमेरे लावण्यात आले. त्यात पट्टेदार वाघ दिसल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ भारतीय वन्यजीव संस्थेला संपर्क केला.
n त्यांना कॅमेरात टिपलेले फाेटाे पाठविले. ते पाहून संस्थेने वाघाची ओळख पटविली. प्रत्येक वाघाचे पट्टे वेगळे असतात. संस्थेने याच वाघाची माहिती २०२१ मध्ये नाेंदविली हाेती.
यापूर्वीदेखील एका वाघाचा ३०००, किमीचा प्रवास
यापूर्वी टिपेश्वर (जि. यवतमाळ) येथील कॉलर आयडी असलेला वाघ तेलंगणात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात आला होता. त्याने तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. अखेर हा वाघ बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला होता.
विदर्भातील वाघ ओडिशामध्ये गेल्याची ही पहिलीच नाेंद आहे. तो बहुतांशी जाेडीदाराच्या शाेधात आला असावा.
- आनंद एस. डीएफओ,
परलेखामुंदी, ओडिशा
वाघांची संख्या
महाराष्ट्र ४४४
ओडिशा २०
छत्तीसगड १७
आंध्र प्रदेश ६३