प्रेमासाठी वाट्टेत ते... ताडोबात मायासाठी भिडले रुद्र आणि बलराम
By राजेश भोजेकर | Published: March 14, 2023 04:41 PM2023-03-14T16:41:18+5:302023-03-14T16:43:29+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांची झुंज
चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नेहमी वन्यजीवांच्या घडमोडींनी जगभर चर्चेत असते. रविवारी ताडोबात काळ्या रंगाच्या मादी बिबट्यासोबत काळ्या रंगाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. या दिवशी आणखी एक घटना ताडोबात घडली. ती सुद्धा चांगलीच चर्चेत आली आहे.
ताडोबात माया नावाची वाघिण प्रसिद्ध आहे. बहुतेक पर्यटक तिच्या प्रेमात पडतात. याच माया वाघिणीचे प्रेम मिळविण्यासाठी रुद्र आणि बलराम या दोन वाघांमध्ये चांगलेच युद्ध झाले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरमधील मोहर्ली क्षेत्रात रविवारी सकाळी झालेल्या थरारक युद्धात बलरामने रुद्रवर मात केली आणि मायाचे मन जिंकले.
हा सर्व घटनाक्रम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी कॅमेराबद्ध केला. आँखो देखा हाल सांगताना पाठक म्हणाले, ताडोबामध्ये वाघिणीशी समागम करण्यासाठी अनेकदा दोन वाघांची झुंज होत असल्याचे बघायला मिळते. आम्ही रविवारी ताडोबाच्या कोअरमध्ये मोहर्ली क्षेत्रातून जात असताना अशीच एक घटना बघायला मिळाली. रुद्र आणि बलराम या दोन वाघांमध्ये झुंज सुरू होती. आम्ही ही झुंज डोळ्यात साठवत होताे.
सुमारे १५ मिनिटे दोन्ही वाघ चांगलेच भांडले. यामध्ये ते रक्तबंबाळही झाले. बलरामच्या पुढे रुद्रचे काहीही चालले नाही. अखेर प्रेमासाठीच्या या युद्धात बलराम जिंकला. नंतर हे दोन्ही वाघ आपापल्या दिशेने निघून गेले. आम्हीही तिथून परत निघालो. दुपारी या परिसरात काहीजण गेले असता त्यांनी माया आणि बलरामला सोबत बघितल्याचे कळले. मात्र याचे छायाचित्र वा चित्रीकरण कुणाकडेही नाही. बलरामने रुद्रवर मात केली. याचा अर्थ नक्कीच बलरामने मायाचे मन जिंकले असेल.