चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या दोन दुर्दैवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:15 PM2021-12-17T13:15:47+5:302021-12-17T13:37:13+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या मृत्यूच्या दोन घटना समोर आल्यात. सावली तालुक्यात एका वाघाच्या हत्येचा प्रकार समोर आला तर मोरवा बिटात वाघाचा मृतदेह एका शिवारात आढळून आला.

Two tigers found dead in Chandrapurs sawli tehsil and morwa area | चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या दोन दुर्दैवी घटना

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या दोन दुर्दैवी घटना

Next
ठळक मुद्देसावली तालुक्यात शिकारमोरवा बिटात झुंजीत बछड्याचा बळी

चंद्रपूर : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन वाघांचामृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता शिवारात विद्युत करंटने वाघाची शिकार करण्यात आली, तर चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील मोरवा बिटात दोन वाघांच्या झुंजीत एका बछड्याचा मृत्यू झाला.

वनपरिक्षेत्र कार्यालय सावलीअंतर्गत येत असलेल्या पेंढरी मक्ता येथे तीन महिन्यांपूर्वी पट्टेदार वाघाचा शेतातील विद्युत प्रवाहित कुंपणाला स्पर्श होऊन मृत्यू झाला. संबंधित शेतकरी व अन्य तिघांनी या वाघाच्या मिशा काढून मृतदेह जमिनीत पुरला. शिकार झाल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधित शेतकऱ्याच्या घरी धाड टाकली. चौकशीअंती चौघांना अटक केली आहे.

शेतीचा हंगाम सुरू असताना तीन-चार महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याने विद्युत प्रवाहित कुंपण केले होते. दरम्यान, त्या कुंपनाच्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पट्टेदार वाघ मरण पावला. त्या वाघाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृत वाघाला जमिनीत पुरले. वन विभागाला ही बाब माहीत होताच त्यांनी एका घरी धाड टाकली असता वाघाच्या मिशा आढळून आल्या. याप्रकरणी पांडुरंग मोनाजी गेडाम (४५), हिराचंद मुखरू भोयर (३५), रामदास बाजीराव शेरकी (५५), मारुती पोचू गेडाम (३६), सर्व रा. पेंढरी मक्ता यांना अटक केली. अधिक चौकशी केल्यानंतर जमिनीत पुरलेला वाघाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता चारही आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.बी. कामडी यांच्यासह पंढरीचे क्षेत्रसहायक भोयर, पाथरीचे वासुदेव कोडापे, व्याहाड खुर्दचे सूर्यवंशी आणि वनरक्षक करीत आहेत.

वाघाच्या बछड्याची झुंज

चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील मोरवा बिटात अंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राच्या अॅश बॅन्ड परिसरात बुधवारी सायंकाळी वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू वाघांच्या झुंजीत झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राचे सुरक्षारक्षक गस्त घालत असताना हा बछडा मृतावस्थेत आढळून आला.

याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन गुरुवारी त्याचे शवविच्छेदन केले. हा मादी बछडा असून साधारणत पाच ते सहा महिन्यांचा आहे. याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी वर्तविला आहे. त्याचे सर्व अवयव शाबूत होते.

Web Title: Two tigers found dead in Chandrapurs sawli tehsil and morwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.