ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींसह बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 10:28 AM2022-12-02T10:28:53+5:302022-12-02T10:42:07+5:30
नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज : नमुन्यांची होणार तपासणी
चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात दोन वाघिणींसह एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ताडोबा प्रशासनाने शवविच्छेदन करून नमुने घेतले. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. मात्र, बछड्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात तर दोन वाघिणींचा मृत्यू नैसर्गिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी येथील कक्ष क्र. १८९ मध्ये सहा- सात महिन्यांच्या वाघाचा बछडा (मादी) गुरुवारी मृतावस्थेत आढळला. हा बछडा टी ६० या वाघिणीचे असल्याचे कळताच सहायक वनसंरक्षक बापू येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. संजय बावणे, बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर यांनी तातडीने घटनास्थळी गाठून पाहणी केली.
वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे आणले. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून तपासणीसाठी नमुने घेतले. बछड्याचा मृत्यू नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याच्या शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थितीवरून आल्याची माहिती ताडोबा प्रशासनाने दिली. दुसरी घटना शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा नियत क्षेत्रालगत बुधवारी उघडकीस आली.
मृत वाघीण टी ७५ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत वाघिणीचे अंदाजे १४-१५ वर्षे होते. या वाघिणीचा मृत्यू वृद्धावस्थेमुळे झाला. वाघिणीचे अवयव व कातडी कुजलेल्या स्थितीत आढळले. दात व नखे सुस्थितीत आढळून आली, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. रामगावकर यांनी दिली.
वासेरा परिसरात ‘कोंड पाटील वाघिणी’चा केवळ सांगाडा
बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्र वासेरा परिसरातील महसूल विभाग गट नंबर १८५ येथे बुधवारी शिवनी वनपरिक्षेत्राचे वनरक्षक गस्त घालत असताना एक वाघीण मृतावस्थेत आढळली. ही वाघीण ‘कोंड पाटील वाघीण’ अशा नावाने ओळखली जात होती. या वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला असून अंदाजे १५ दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, अशी माहिती वनविभागाने दिली. वाघिणीचे अर्धे मांस हे नष्ट झाले असून काही प्रमाणात सांगाडा दिसत आहे.