युवकांनीच पकडले दोन ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:48 PM2018-03-09T23:48:47+5:302018-03-09T23:48:47+5:30
रेतीची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक येथील काही युवकांनी पकडून उपविभागीय कार्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली. मात्र रेती तस्करांनी आपले हायवा ट्रक उपविभागीय कार्यालय परिसरातून परस्पर घेऊन गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आॅनलाईन लोकमत
मूल : रेतीची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक येथील काही युवकांनी पकडून उपविभागीय कार्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली. मात्र रेती तस्करांनी आपले हायवा ट्रक उपविभागीय कार्यालय परिसरातून परस्पर घेऊन गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूल तालुक्यातून रेती वाहतुक करणारे दोन हायवा ट्रक गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास काही युवकांनी तहसील कार्यालयासमोर पकडले. त्यानंतर हायवा ट्रक तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आले. शुक्रवारी हायवा मालकांकडून उपविभागीय अधिकारी यांनी माहिती घेतली असता रेती वाहतुकीची टिपी मोहर्ली उसेगांव (चामोर्शी) घाटावरची आहे. मात्र यावर इनवाईस नंबर नसल्याने याबाबत चौकशी करून, यात गैर आढळल्यास वाहने जमा करू, असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले. हायवा मालकांना हायवा जमा करण्याचे आदेश दिल्याने हायवा उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आले.
सूर्यास्तापूर्वी आणि सुर्योदयानंतर रेती उत्खनन करता येत नाही. असे असताना नियमबाह्य रेती वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. पर्यावरण विभागाने रेती उत्खननासाठी अनेक अटी लादल्या आहेत. मात्र त्याचे पालन केले जात नाही.
रेती तस्करी थांबवा
मूल तालुक्यातून रेती कंत्राटदार नियमबाह्य पध्दतीने रेती उपसा व वाहतूक करीत असल्याने यावर आळा घालावा, अशी मागणी श्रमिक एल्गारने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. मागील वर्षीही मोठया प्रमाणावर रेती तस्करी झाली. याबाबत श्रमिक एल्गारने स्थानिक पातळीवर व मंत्रालयात पुराव्यासह तक्रार केली होती. विभागीय आयुक्तांनी यावर जिल्हाधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते. मात्र रेती तस्कर व या विभागाचे मधुर संबध, यामुळे या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही, असेही श्रमिक एल्गारने म्हटले आहे.