नोकरीच्या नावावर दोन बेरोजगार युवकांना ३० लाखांनी गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:49 IST2025-04-02T15:48:16+5:302025-04-02T15:49:07+5:30
आठ जणांविरुद्ध गुन्हा : मंत्रालयात अधीक्षक पदावर असल्याची केली बतावणी

Two unemployed youths were duped of Rs 30 lakhs in the name of jobs
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मंत्रालयात अधीक्षक पदावर असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन युवकांना तब्बल २९ लाखांनी गंडविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १) चंद्रपुरात उघडकीस आली. याप्रकरणी दुर्गापूर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला. शिल्पा बसंतकुमारी उदापुरे, बसंतकुमार उदापुरे, लॉरेन्स मरीदास हेनरी, जॉन मरीदास हेन्री, नितीन साठे, सचिन डोळस, राकेश आत्राम, प्रकाश आत्राम अशी आरोपींची नावे आहेत.
दुर्गापूर येथील सौरभ डोलीराम भुते व पलाश शंकर दहीवडे हे दोन युवक बेरोजगार आहेत. या दोघांना आरोपी मित्र प्रकाश आत्राम याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, म्हणून इतर आरोपींशी भेट घालून दिली. फिर्यादी युवकांनी या आरोपींवर विश्वास ठेवला आणि आरोपींनी वेळोवेळी केलेल्या मागणीप्रमाणे १९ लाख रूपये दिले. आरोपी शिल्पा उदापुरे ही आरोग्य विभाग मंत्रालयात अधीक्षक पदावर असल्याचे सांगून तिनेही या युवकांकडून पैसे उकळले. नियुक्तीचे पत्र लवकरच मिळेल, अशा भूलथापा दिल्याने युवकांनी एकूण २९ लाख आरोपींच्या खात्यात ऑनलाइन टाकले. युवकांनी नियुक्ती पत्र देण्याचा तगादा लावल्याने एक बनावट पत्र तयार करण्यात आले. या युवकांनी हे नियुक्त पत्र घेऊन आरोग्य विभागात गेले असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोघांनाही दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आठ जणांना गुन्हा दाखल केला. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.
२ लाख रूपये पहिल्या बोलणीतच टोकन म्हणून घेतले
चंद्रपूर व गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नियुक्त होणार असे गाजर दाखवून युवकांकडून पैसे वसूल केले.
तयार केले नकली शासकीय ओळखपत्र
सौरभ भुते व पलाश दहीवडे या युवकांकडून नोकरीबाबत वारंवार विचारणा होऊ लागली. त्यामुळे या दोघांनाही एकदा मंत्रालयात बोलावण्यात आले होते. आरोपी शिल्पा उदापुरे या महिलेने आरोग्य विभागात अधीक्षक असल्याचे सांगून शासनाचे नकली ओळखपत्र तयार केले. मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर फिर्यादीशी भेटून नोकरी लावून देत असल्याचे सांगितले.
युवकांना बोलावले होते मुंबईत
नितीन साठे व सचिन डोळस हे मंत्रालयातील आरोग्य विभागात कार्यरत आहेत. त्यांनाही नोकरी लावून देत असल्याचे फिर्यादींना सांगितले व नियुक्ती पत्र दिले. शंका आल्याने युवकांनी दुसऱ्या दिवशी मंत्रालयात गेले असता संबंधित कक्षात आरोपी शिल्पा उदापुरे गायब झाल्याचे आढळून आले. त्यांच्या नावाची पाटी देखील कक्षात आढळली नाही. फोन केल्यानंतर मोबाइल स्वीच ऑफ दाखवला, असेही पिडीत युवकांनी तक्रारीत नमूद केले आहे.