दुचाकी - बस अपघातात दोन ठार
By admin | Published: April 28, 2016 12:43 AM2016-04-28T00:43:51+5:302016-04-28T00:43:51+5:30
येथून तीन किमी अंतरावर असलेल्या किटाळी येथील बसस्थानकावर समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस व दुचाकीत धडक बसली.
शंकरपूर : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या किटाळी येथील बसस्थानकावर समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस व दुचाकीत धडक बसली. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर १६ प्रवाशी जखमी आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
साखरचंद राजेराम बोरबांधे (५५) व बसमध्ये असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डाखोरे अशी मृतांची नावे आहेत.
आज सकाळी ९.३० च्या सुमारास ब्रह्मपुरी आगाराची बस (क्र. एचएच- ०७ सी ७७२७) प्रवासी घेऊन चिमूर मार्गे वरोराकडे जात होते. तर साखरचंद बोरबांधे व त्यांच्या पत्नी वंदना बोरबांधे दोघेही शंकरपूरकडे येत होते. बस स्टँड ओलांडताना समोरुन येणारी बस लक्षात आली नाही. बसचालकाला अचानक समोरुन दुचाकी येत असल्याचे लक्षात आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाने ब्रेक दाबला. यामुळे बसल पलटली व बसला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीस्वार राजेराम बोरबांधे व बसमधील प्रवाशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डाखोरे यांचा मृत्यू झाला.
बस उलटल्याचे लक्षात येताच गावातील गावकरी व रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांनी बसमधील इतर जखमी प्रवाशांना शंकरपूर येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरती केले यात बसचालक श्रीकृष्ण काकपूरे (५०), डी. ए. सपकाळ ब्रह्मपुरी आगारचे कर्मचारी अविनाश गाठोडे रा. अकोला (५१) गंभीर जखमी आहेत.
डाखोरेंच्या अपघाती निधनाने शंकरपूरवासी हळहळले
या अपघातात मृत डॉ. संतोष डाखोरे हे शंकरपूर येथील स्वास्थ केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून २००८ मध्ये रुजू झाले होते. त्यांनी येथे सहा वर्ष आपली सेवा दिली. यावेळी त्यांनी अनेकांची मने जिंकून घेतली होती. वैद्यकीय क्षेत्राच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रमात ते भाग घेत असत. त्यामुळे डॉ. संतोष डाखोेरे यांनी जनसामान्याच्या व रुग्णांचा मनात घर केले होते. त्यांचे १५ दिवसांपूर्वीच साक्षगंध झाले होते. त्यांच्या या अकाली मृत्यूने शंकरपूरात हळहळ व्यक्त होत आहे.