मोदी सरकारची दोन वर्षे राष्ट्र विकासाला समर्पित
By Admin | Published: June 20, 2016 12:36 AM2016-06-20T00:36:52+5:302016-06-20T00:36:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा हिशेब देशातील लोकांना दिला.
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : भद्रावती येथे द्विवर्षपूर्ती विकासपर्व कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीचा हिशेब देशातील लोकांना दिला. लोकशाहीत अशाच प्रकारची संवेदनशीलता अभिप्रेत आहे. भाजपप्रणित सरकारने हे कर्तव्य पार पाडले, हाच खरा आदर्श आहे. प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित होता कामा नये, हा दृष्टिकोन ठेवून मोदी सरकारने सर्व घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण, शहरी लोक, बेरोजगार, महिला, माजी सैनिक आदींचा समावेश आहे अशा सर्वांना सामावून घेणारे कार्य केंद्र सरकारच्या माध्यमातून अवघ्या दोन वर्षात पार पडले. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
वरोरा विधानसभा क्षेत्रांतर्गत भद्रावती येथे शुक्रवारला पार पडलेल्या द्विवर्षपूर्ती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, ज्येष्ठ नेते बळवंत गुंडावार, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, ज्येष्ठ नेते खुशाल बेंडे, जि.प. सदय विजय वानखेडे, देवराव भोंगळे, सुरेश महाजन, अशोक हजारे, डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, तुळशीराम श्रीरामे, ओम मांडवकर, राहुल सराफ, नरेंद्र जीवतोडे, सुरेश महाजन, रवींद्र नागपुरे, शेखर चौधरी, किशोर गोवारदिपे, विजय मोकासे, प्रवीण सातपुते, विकास खटी, प्रशांत डाखरे, गोपाल गोस्वाडे आदींचीे उपस्थिती होती.
ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, पंतप्रधानांनी अत्यंत व्यापक दृष्टिकोन ठेवून अटल निवृत्ती वेतन, जनधन योजना, गॅस सबसीडी, सर्व समावेशक पीक विमा योजना, दिनदयाल ग्रामज्योती योजना, कृषी सिंचन योजना, स्वयं रोजगारासाठी मुद्रा बँक योजना व अनेक लोक कल्याणकार योजना देऊन देशाच्या विकासाला गतीशिलता दिली. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व स्वयं रोजगाराला प्रोत्साहन, रासायनिक खतावर सबसीडी देवून वाढत्या भ्रष्टाचारावर अंकुश घातला, असे सांगत काँग्रेसच्या राजवटीत रस्त्याची कामे ३.५ कि.मी. व्हायची, गडकरींच्या मंत्रालयााने हिच कामे प्रतिदिन १८ कि.मी. करुन चमत्कार घडविला. संपुआच्या काळात देशात ६ वॉटर वे होते, आज मोदी सरकारने १०६ वॉटरवेला मंजुरी दिली. यामुळे भविष्यात जल वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, हरीश शर्मा, संजय देवतळे आदींनी केंद्र व राज्य सरकारच्या लोक हितकारी योजनांचा आपल्या भाषणातून परामर्श घेतला. मोदीजींच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात विकासाचा जो टप्पा गाठला, ते कार्य सरकारच्या लोकहिताच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना कधीही साध्य झाले नाही, असेही या वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल सराफ यांनी केले तर संचालन किशोर गोवारदिपे यांनी केले.
या कार्यक्रमाला स्थानिक भाजपा पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)