परिश्रमाची गरिबीवर मात; छोट्या गावातील दोन तरुण बनले अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 02:43 PM2023-07-11T14:43:21+5:302023-07-11T14:45:46+5:30
छोट्याशा ओवाळा गावातील दोन तरुणांनी केली एमपीएससी क्रॅक
सावरगाव (चंद्रपूर) : अंगात चिकाटी,उरात प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि कष्ट उपसण्याची तयारी असली की मनुष्यासाठी कुठलेही काम अशक्य राहत नाही. हे सिद्ध करून दाखविले आहे, एका छोट्याशा गावच्या दोन जिगरबाज तरुणांनी. लोकेश शालिक मोहुर्ले व मोसम ज्ञानेश्वर मोहुर्ले अशी त्यांची नावे आहेत. दोघेही नागभीड तालुक्यातील ओवाळा या गावचे मूळ रहिवासी आहेत.
शालिक उष्टुजी मोहुर्ले या अत्यंत अल्प शेती असलेल्या शेतकऱ्याचा लोकेश मोहुर्ले हा मुलगा. घरची परिस्थिती बेताचीच. मात्र वडिलांनी कठोर कष्ट उपसून मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. लोकेश मोहुर्ले याचे दहावीपर्यंतचे शिक्षण जवळच्याच तळोधी (बा.) येथील लोक विद्यालयात झाले. त्यानंतर ब्रम्हपुरीच्या नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयात बारावी आणि डीआयइटी कॉलेज,चंद्रपूर येथून डी.एड. पूर्ण केले. नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून बीए पूर्ण करीत तो पुणे येथे भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गासाठी गेला. आणि सन २०१५ पासून त्याने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.
सुरुवातीला यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र त्यांनी सतत प्रयत्न करून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत ११ महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब मुख्य परीक्षा २०२१ च्या राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या पास करीत उत्तुंग यश मिळविले. आणि आता शासनाच्या ' राज्य कर निरीक्षक ' या पदावर ते रुजू झाले आहे.
मोसम ज्ञानेश्वर मोहुर्ले हा सुद्धा ज्ञानेश्वर श्रावण मोहुर्ले या गरीब शेतकऱ्याचा मुलगा. त्याने दाखवून दिले की प्रतिभेचा श्रीमंतीशी काहीही एक संबंध नाही. बालपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने आयुष्य व्यतीत केले आहे.त्यामुळे बालपणापासूनच त्याला परिस्थितीची चांगली जाणीव आहे. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोक विद्यालय तळोधी(बा.) येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय तळोधी(बा) येथे बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आणि पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. यासाठी त्याने पुणे येथे लायब्ररीत अभ्यास केला. परिस्थिती बेताची असल्याने नागपूर येथेच पुढील शिक्षण घेतले.
एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु सुरुवातीला त्यालाही यश मिळू शकले नाही. मात्र त्यानंतर त्यांनी सतत प्रयत्न केले आणि केवळ मेहनतीच्या बळावर एमपीएससी ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून उत्तुंग यश मिळविले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब मुख्य परीक्षा २०२० च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आणि यात यश मिळवीत ' पोलिस उपनिरीक्षक ' या पदावर त्याने सिद्धता मिळविली.
ओवाळा गावाचा लौकिक वाढविला
नागभीड तालुक्यातील आडवळणावर असलेले ओवाळा हे छोटेशे गाव. या गावाची लोकसंख्या केवळ साडेतेराशे एवढीच आहे.शेती हाच या गावचा प्रमुख व्यवसाय. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून या दोन्ही तरुणांनी शिक्षणाची पायाभरणी केली. एमपीएससी परीक्षेत यश मिळविले. या संपूर्ण गावातून ' हे दोनच ' एकमेव अधिकारी ठरले. त्यांच्या या यशामुळे ओवाळा गावाचा ही लौकिक वाढला आहे.