किरकोळ वादातून दोन लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 02:15 PM2021-10-25T14:15:15+5:302021-10-25T14:18:45+5:30
कौटुंबिक वादातून दोन सख्या लहान भावांनी मोठया भावाला डिझेल टाकून पेटविले. ही घटना रविवारी गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात घडली.
चंद्रपूर : गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात दोन सख्या लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मोठा भाऊ गंभीर जखमी असून त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
रवी उर्फ रोहिदास रामजी मूनेश्वर (३८), अमृत रामजी मूनेश्वर (३०) अशी आरोपींची नावे असून रामजी मूनेश्वर (४६) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. रविवारी सकाळच्या सुमारास लहान मुलांवरुन आरोपी व जयदेवच्या पत्नींमध्ये वाद झाला. त्यानंतर रवी मुनेश्वर व अमृत मुनेश्वर या दोन्ही भावांनी राग मनात ठेवून जयदेव शेतातून आल्यावर त्याच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले.
जयदेवची किंकाळी ऐकताच त्याचा मुलगा व पत्नी धावत आले, त्यांनी तत्काळ आग विझवली. त्यानंतर जखमी जयदेवला प्रथम गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून रवी आणि अमृत या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.