कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार
By Admin | Published: November 15, 2016 12:45 AM2016-11-15T00:45:43+5:302016-11-15T00:45:43+5:30
राज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे.
रोपेच गायब : रोप लागवडीवर २० लाख रुपयांचा खर्च
राजू गेडाम मूल
राज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मूल तालुक्यातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर क्षेत्रावर बांबूचे रोपवन लावण्यात आले होते. त्याकरिता पाच वर्षांमध्ये २० लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात तेथे लावलेली रोपेच नसल्याने कुंपणानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
वनाचे क्षेत्र वाढावे जेणे करून जमिनीची धूप थांबविता येईल, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत वृक्ष लागवड व संगोपणावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात येत आहे. २०११ मध्ये चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत मूल परिक्षेत्रातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर जागेवर बांबू रोपवन करण्यात. रोपवनाची संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागाची असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
यावर्षी वनाची लागवड व संगोपण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून हजारो हेक्टर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वन विभागाला लाखो रुपयांचा निधी वितरित करून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. मात्र दहेगाव या क्षेत्रात असलेल्या प्रकारासारखा इतरही वनक्षेत्रात असलाच प्रकार आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याच प्रकारचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र अधिकाऱ्यांची लॉबी मंत्र्यापर्यंत असल्याने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठिशी घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वन विभागाचे अधिकारी यात गुंतले असल्याने दहेगाव प्रकाराबाबत वाच्यता केली जात नाही. कुंपणच शेत खायला लागल्याने ते रोपे गायब होणारच, अशी सर्वत्र चर्चा केली जात आहे.
विभागीय वनाधिकाऱ्यांना आढळलेले नैसर्गिक बांबू
दहेगाव येथे व्यवस्थापन समितीच्या वतीने २५ हेक्टरवर बाबू रोपवनाची लागवड करण्यात आली. त्यावर २०११ ते २०१६ पर्यंत २० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नैसर्गिक वाढलेले काही बांबू आढळले. २०११ मध्ये रोपवन लावल्यानंतर चंद्रपूर येथील मूल्यांकन खात्याचे विभागीय वनाधिकारी आर.एच. पांडव, वनक्षेत्र सर्वेक्षक के. एम. जिडगीलवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रोपांचे मूल्यांकन केले. त्यावेळी त्यांना कक्ष क्र. ५१७ मधील रोपवनात नैसर्गिकरित्या भेरा, येन, बाबू, गराडी, धावळा, साग, रोहन, तेंदू, कडू लिंब आदी प्रजातीतील झाडे आढळून आली. कक्ष क्र. ५१७ मधील नैसर्गिकरित्या वाढलेले बांबू व इतर मिश्र रोपे दिसत असल्याने लागवडीचे बांबू कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.