कृषी कायद्याविरोधात लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:10+5:302020-12-15T04:44:10+5:30
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या तीनही नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान आंदोलन चंद्रपूरने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोमवारी जन ...
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या तीनही नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान आंदोलन चंद्रपूरने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोमवारी जन विकास सेना व जाट सभेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
दिल्लीच्या आंदोलकांनी देश पातळीवर पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला समर्थन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तीनही नविन कृषी कायदे मागे घ्यावे, उद्योगपतीच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे नव्याने तयार करण्यात यावे. तसेच हमीभावाला कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत किसान आंदोलन चंद्रपूरचा विरोध सुरू राहील, अशी भूमिका जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्लीमधील किसान आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून दुपारी १२ वाजता लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन बन्सोड, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे ,सिटूचे दिलिप राव यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. अक्षय येरगुडे, गितेश शेंडे, आकाश लोडे,राहुल दडमल यांनीसुद्धा यावेळी नवीन शेतकरी कायद्याबद्दल भूमिका मांडली. दुपारी ४ वाजता राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता करण्यात आली.