बाळासाहेब ज्यांच्याशी लढले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी केली हातमिळवणी - जे. पी. नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:28 AM2023-06-18T05:28:59+5:302023-06-18T05:29:14+5:30
भाजपच्या मिशन १४४ अंतर्गत सोमवारी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित विजय संकल्प जाहीर सभेत ते बोलत होते.
चंद्रपूर : महाराष्ट्र शौर्य आणि वीरतेसाठी ओळखला जातो. त्या महाराष्ट्रातील एक गोष्ट सांगताना दु:ख होते. हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आयुष्यभर ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याशीच उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी हातमिळवणी करून पाठीत खंजीर खुपसला, अशी घाणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली.
भाजपच्या मिशन १४४ अंतर्गत सोमवारी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित विजय संकल्प जाहीर सभेत ते बोलत होते. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मंडळींमध्ये बैठक झाली. यावेळी केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, असा सर्वांचा सूर होता; परंतु चांगला निकाल हाती येताच उद्धव ठाकरे यांची सत्तेची लालसा जागृत झाली. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. अखेर त्यांनी विचारधारेशी तडजोड करून पाठीत खंजीर खुपसला; पण अनैसर्गिक सत्ता टिकत नाही. त्यांना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन याचे उत्तर दिले आहे, अशा शब्दांत नड्डा यांनी शिंदे-फडणवीस सरकारची पाठराखण केली.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते. नड्डा यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. जे. पी. नड्डा यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामांचे काैतुक केले. यावेळी सर्वाधिक फोकस मुनगंटीवार यांच्यावरच होता. मुनगंटीवारच भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.