कॅशलेस होण्याआधीच उहापोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2017 12:45 AM2017-03-25T00:45:03+5:302017-03-25T00:45:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत.
पिरली गावातील वास्तव : रोखद्वारेच होताच व्यवहार
विनायक येसेकर भद्रावती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत. अशीच एक या तालुक्यातील पिरली गावाची बातमी प्रकाशित झाली. यासंदर्भात प्रत्यक्ष गाव भेट घेऊन तेथील ग्रामस्थांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, येथे आजही रोख रकमेद्वारे बहुतेक व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पिरली हे एकमेव गाव कॅशलेस झाल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या बातमीने कुतूहल जागृत होवून गावास प्रत्यक्ष भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीयीकृत शाखा भद्रावतीच्या माध्यमातून या गावात शिबिर घेण्यात आला. त्या ठिकाणी मतदार यादीनुसार प्रत्येक कुटूंबाच्या कुटूंब प्रमुखाचे खाते काढण्यात आले. त्या सर्वांना डेबीट कार्ड देण्यात आले आणि गावातील चार व्यवसायीकांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. याद्वारे पुढील आर्थिक व्यवहार या डेबीट कार्डद्वारे करावा, असे आवाहन शाखा प्रबंधक राजसिंह बिसेन यांनी केले. एक हजार लोकवस्ती असलेल्या या गावात १६० ग्रामस्थांची खाते उघडण्यात आली. तसेच चार दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर काही वृत्तपत्रात संपूर्ण गाव कॅशलेस झाल्याचे वृत्त देवून आश्चर्यचकित केले. याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक राजसिंह बिसेन यांना विचारना केली असता, आम्ही कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून साहित्य पुरविले आहे. तसेच मार्च २०१७ नंतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाईल. गाव कॅशलेस झालेला नाही. परंतु, आम्ही त्यादृष्टीने प्रयत्नरत राहू. तालुक्यातील टाकळी व चिचोर्डी हे दोन गाव कॅशलेससाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
कॅशलेस व्यवहार चांगले मात्र मार्गदर्शन आवश्यक
कॅशलेस व्यवहार हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. शेतकरी हा वेगवेगळ्या गोष्टींच्या खेरदीकरिता कॅश घेवून शहरात जात असतो. रक्कम चोरी होण्याची भीती असते. या व्यवहाराने सुरक्षित आणि चिंतामुक्त राहू शकते. मात्र यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. आजच्या घडीला पिरली गाव कॅशलेस झाले नाही, असे मत पिरली गावातील प्रगतशिल शेतकरी नंदू वाढई यांच्यासह प्रवीण बोधाने, सामाजिक कार्यकर्ते महेश डाखरे यांनी व्यक्त केले.
वृत्तपत्रात आलेली बातमी ही दिशाभूल करणारी आहे. आमच्या गावात बँक आॅफ इंडियातर्फे डिजीटल इंडियाच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी ग्रामस्थांना डेबीट कार्ड तर व्यवसायिकांना स्वाईप मशीन देण्यात आली. परंतु, याचा वापर एक-अर्धा ग्राहक वगळता कुणीच करीत नाही.
- महादेव कोल्हे,
सामाजिक कार्यकर्ते पिरली
माझ्या दुकानात बँक आॅफ इंडियाने स्वाईप मशिन लावून दिली आहे. परंतु सुरुवातीला एक-दोन ग्राहकांनी डेबीट कार्डचा वापर करून व्यवहार केला. संपूर्ण व्यवहार कॅशलेस व्हायला वेळ लागेल. या गावातील ग्रामस्थ या व्यवहाराबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार पूर्णत: होण्यास बराच वेळ लागेल.
- निलेश मोदी,
व्यवसायिक पिरली
संपूर्ण कॅशलेस व्यवहारासाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे म्हणजे संपूर्ण गाव कॅशलेस झाला असे होत नाही. याकरिता प्रशिक्षणाची गरज आहे. जोपर्यंत प्रशिक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावातील आर्थिक व्यवहार कॅशलेस होणार नाही. कॅशलेस हे दिवसास्वप्नच ठरेल.
- अर्चना डाखरे
गृहिणी तथा
ग्रामपंचायत सदस्य पिरली.