उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे पाण्याचे कंत्राट अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:37+5:30

कंत्राटदाराकडून करारनाम्यातील अटींचे वारंवार उल्लंघन होणे, देय रकमांचा भरणा न करणे, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न करता वारंवार अडथळे निर्माण करणे, मनपाच्या आदेशाचे पालन न करणे इत्यादी कारणांमुळे कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्याबाबत मनपाकडून कंत्राटदाराला अनेकदा ताकीद, सूचना देण्यात आल्या. परंतु कंत्राटदारांकडून कोणत्याही सूचनेची दखल घेण्यात आली नाही.

Ujjwal construction water contract finally canceled | उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे पाण्याचे कंत्राट अखेर रद्द

उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे पाण्याचे कंत्राट अखेर रद्द

Next
ठळक मुद्देमनपाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पाणी पुरवठ्यात हयगय भोवली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका व उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबतचा २०११ रोजी अस्तित्वात आलेला करार रद्द करण्याचा ठराव चंद्रपूर महानगरपालिकेने अखेर पारित केला. शुक्रवारी झालेल्या पाणी पुरवठा विशेष सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. सर्व नगरसेवकांनी एकमुखाने हा ठराव पारित केला. यापुढे शहराचा पाणीपुरवठा महापालिका करणार आहे.
कंत्राटदाराकडून करारनाम्यातील अटींचे वारंवार उल्लंघन होणे, देय रकमांचा भरणा न करणे, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न करता वारंवार अडथळे निर्माण करणे, मनपाच्या आदेशाचे पालन न करणे इत्यादी कारणांमुळे कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्याबाबत मनपाकडून कंत्राटदाराला अनेकदा ताकीद, सूचना देण्यात आल्या. परंतु कंत्राटदारांकडून कोणत्याही सूचनेची दखल घेण्यात आली नाही. कंत्राटदाराच्या चुकीमुळे नागरिकांमध्ये मनपाबाबत रोष निर्माण होत होता. या सर्व कारणांमुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या महानगरपालिकेत झालेल्या पाणीपुरवठा विशेष बैठकीत कंत्राटदारावर ठोस कारवाई करण्याचे संकेत मनपातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार सदर कंत्राट रद्द करण्यात आला आहे.
बऱ्याच दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे चंद्रपूरकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. इरई धरणात पुरेसा जलसाठा असतानाही निव्वळ कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे शहरात अनियमित पाणीपुरवठा केला जात होता.
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे केला जाणारा अनियमित पाणीपुरवठा व बेजबाबदार वर्तनाच्या पार्श्वभूमीवर मनपातर्फे अनेकदा नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. अनेकदा संधी देऊनही कंत्राटदाराच्या कार्यपध्दतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने लोकहिताच्या दृष्टीने निर्णायक पाऊल मनपाद्वारे उचलण्यात आले आहे.
दरम्यान, या विशेष सभेत निर्णय जाहीर करताना महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या, सभागृहाच्या व मुख्यत्वे नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीशी केलेला करार रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. यापुढे पाणी पुरवठयासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांमार्फत काम करण्यात येईल.

बहुतांश नगरसेवकांच्या होत्या तक्रारी
शहरातील पाण्याची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिकेने २०११ रोजी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीबरोबर शहराला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा करार केला होता. मात्र कंपनीद्वारे पुरेसा जलसाठा असतानाही अनियमित पाणीपुरवठा करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात होता. यासंबंधी विचारणा केली असता कंत्राटदाराकडून कुठलेही समाधानकारक उत्तर दिले जात नव्हते. या कंपनीच्या कारभारामुळे नागरिक व नगरसेवक त्रस्त झाले होते. आमचा प्रत्येक दिवस पाण्याच्या समस्येने सुरू होतो, कंपनी नियोजनबद्धपणे काम करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे कंपनीचे कंत्राट रद्दच करावे, अशी मागणी सर्व नगरसेवकांची होती. त्यानुसार कंत्राट रद्द करून शिल्लक थकबाकीही वसूल केली जाणार आहे.

नागरिकांनी पाणी कर मनपात भरावे
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित कुठल्याही व्यक्तीकडे पाणीसंबंधित कराचा भरणा न करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. यापुढे मनपाच्या तीनही प्रभाग कार्यालयात पाणी कराचा भरणा करता येईल. तसेच उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित कुठल्याही व्यक्तीकडे नवीन नळ जोडणीसाठी अर्ज करू नये. यापुढे कुठल्याही नागरिकांनी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत पाणी कराचा व्यवहार केल्यास संबंधित व्यवहाराला महानगरपालिका जबाबदार असणार नाही, असे मनपा प्रशासनाने सभेनंतर स्पष्ट केले आहे.

Web Title: Ujjwal construction water contract finally canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी