उज्ज्वला पुन्हा चुलीवर, महागडा गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:07+5:302021-08-14T04:33:07+5:30
चंद्रपूर :कोरोनाने आर्थिक चक्र बिघडले असतानाच गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी ...
चंद्रपूर :कोरोनाने आर्थिक चक्र बिघडले असतानाच गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी राबविलेल्या उज्ज्वला योजनेसाठी ही दरवाढ अडसर ठरत आहे. लाभार्थ्यांना मोफत कनेक्शन दिले असले तरी सिलिंडरची दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे अनेक महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुुरू केले आहे.
पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही दिली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. सद्य:स्थितीत घरगुती सिलिंडरसाठी ८०० च्या वर रुपये मोजावे लागते. यामुळे या अल्प उत्पन्न कुटुंबीयांना सिलिंडर घेणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश लाभार्थी चुलीवर स्वंयपाक करीत आहेत.
उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना इंधन जमा करण्याची कटकट मिटली होती. मात्र सिलिंडरची दरवाढ सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे मोजमजुरी करून गॅस सिलिंडर कसा भरायचा असा प्रश्न उपस्थित होते आहे. परिणामी अनेक कुटुंबांनी पूर्वीप्रमाणेच चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.
बाॅक्स
गॅस सिलिंडरचे दर (रुपयात)
जानेवारी २०१९ -७१०
जानेवारी २०२०-७४०
जानेवारी २०२१-७९०
ऑगस्ट २०२१-८३५
बाॅक्स
सिलिंडर भरणे कसे परवडणार
उज्ज्वला योजनेतून खरेदी केलेला सिलिंडर घरातच पडून आहे. सरपण गोळा करून आता चुलीवर स्वंयपाक करणे सुरू केले आहे. महागाईमुळे सिलिंडर घेणे परवडत नाही. स्वयंपाक करण्यासाठी महिन्याला हजार रुपये खर्च करणे परवडणारे नाही.
-रिना मोहुर्ले, चंद्रपूर
कोट
गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे चुलीचा वापर वाढला आहे. सरकारने केरोसिन देणे बंद केले. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. एक तर सिलिंडर परवडत नाही. दुसरीकडे सरपण गोळा करणेही सोपे नाही. जंगलात जाण्यावरही बंदी आहे.
मंगला रामटेके, नागभीड
बाॅक्स
आम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर घेतला. मात्र आता सिलिंडरचे दर वाढल्यामुळे ते परवडण्यासारखे नाही. सध्या सरपण जमा करून चुलीवर स्वंयपाक केला जात आहे. दर महिन्यात गॅसच्या किमती सारख्या वाढत आहे. किमती कमी करणे अत्यावश्यक आहे.
ध्रृपदा सोनटक्के