अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 03:21 PM2022-05-03T15:21:46+5:302022-05-03T15:24:45+5:30

कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

Ultratech cement increased productivity but Workers suffocating in the workplace due to cement dust | अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

googlenewsNext
ठळक मुद्देसिमेंटच्या धुळीमुळे कामाच्या ठिकाणी गुदमरतोय कामगारांचा श्वास

राजेश भोजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी माणिकगड युनिटमधील कामगारांना प्रशिक्षित करून उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणण्यात यशस्वी झाली; मात्र प्रचंड धुळीमुळे कामाच्या ठिकाणी कामगारांचा श्वास गुदमरत असल्याने कामगारांच्या आरोग्याचे काय, हा प्रश्न कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

कामगारांना कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात मिळत असला तरी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी सिमेंट कंपनीची आहे; मात्र शासनाने ठरवून दिलेल्या प्रदूषणविषयक कोणत्याही अटी- शर्तींचे पालन कंपनीच्या माणिकगड युनिटकडून होताना दिसत नाही. आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याची जाणीव कामगारांना असूनही त्यांच्यात कंपनीविरोधात आवाज उठविण्याची क्षमता नाही. कामगार संघटनाही याबाबत ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

कामगारांच्या आरोग्याचे सर्वेक्षणच नाही?

कारखाने अधिनियम १९४८, महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९६३ नुसार धोकादायक धुळीच्या कणांमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. कर्कश आवाजामुळे कामगारांना कर्णबधिरतेचा त्रास आहे की काय? याबाबत सुद्धा सर्वेक्षण करणे आवश्यक असते; मात्र ते केले जात नाही. अशा आवाजाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते; मात्र उपाययोजना न करता सतत वायू व ध्वनिप्रदूषण सुरूच असते.

धूळ नियंत्रण यंत्र लावण्यात अडचण काय?

अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर व अंबुजा सिमेंट उपरवाही या शेजारच्या कंपन्यांमध्ये अत्याधुनिक धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात आल्याने वायू प्रदूषणाबाबतच्या तक्रारी कमी आहेत; मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड युनिटबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्याचा उपाय कंपनीजवळ असताना धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात अडचण काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कामगार व नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट

सिमेंटची धूळ गडचांदूर व परिसरातील वस्तीत पसरल्यामुळे गडचांदूरमध्ये अनेक नागरिक व कामगारांमध्ये श्वसन विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुस निकामी होणे, ब्राँकाइटिस, एलर्जी, ॲलर्जिक खोकला, त्वचेचे रोग व केसांवर विपरित परिणाम होऊन केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच या प्रदूषणाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यात आरोग्याची स्थिती भयावह असेल.

डॉ. कुलभूषण मोरे, संचालक, अर्थ फाउंडेशन, गडचांदूर.

Web Title: Ultratech cement increased productivity but Workers suffocating in the workplace due to cement dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.