करवण परिसरात विनापरवानगी विटा उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:40+5:302021-03-13T04:51:40+5:30
महसूल बुडित : महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज मूल: तालुक्यात घराचे व इतर शासकीय इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू ...
महसूल बुडित : महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज
मूल: तालुक्यात घराचे व इतर शासकीय इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने विटा उद्योगाला चांगलीच चालना मिळाली आहे. विटा उद्योगाची परवानगी घेतल्याशिवाय विटा उद्योग सुरू करता येत नाही. मात्र करवण येथील बोकारे नामक शेतकऱ्याच्या शेतात मागील अनेक दिवसांपासून विनापरवानगी विटा उद्योग सुरू आहे.
खोब्रागडे नामक एका व्यक्तीने हा व्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे, महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विनापरवानगी विटा उद्योग करणाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
जमीन खोल खोदून निघालेल्या मातीपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी विटा उद्योग सुरू आहे. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर तालुक्यात विटा उद्योगाची अनेकांनी परवानगी घेऊन शेकडो ब्रास विटा तयार करून विक्री करीत आहे. तालुक्यात ५५ उद्योजकांनी तहसील कार्यालयातून रितसर परवानगी घेतलेली आहे. मात्र करवण येथे खोब्रागडे नामक इसमाने मागील महिनाभरापासून जमीन खोदकाम करून हजारो विटा बनविलेल्या आहे, मात्र अजूनही परवानगी घेतलेली नाही. जोपर्यंत शासनाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत विटा बनविता येत नाही.
बॉक्स
आठ ते दहा हजार रु. भाव
तालुक्यात मोठ्याा प्रमाणावर घरकूल योजनेचे लाभार्थी आहेत. शासनाच्या निधीअंतर्गत अनेक कामे सद्य:स्थितीत सुरू आहे. सदर बांधकामासाठी विटाची नितांत गरज आहे. यामुळे विटा व्यवसायिकांनी आठ ते दहा हजार रुपये दरानेे विटा विक्री करीत असल्याचे बोलल्या जात आहे. शासनाचा महसुल बुडवून विनापरवानगी विटा उद्योग सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोट
मूल तालुक्यातील मौजा करवण परिसरात अवैध विटा उद्योग सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली, विटा उद्योग संबंधाने चौकशी करू आणि विनापरवानगी विटा उद्योग सुरू असल्यास तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवून कारवाईसाठी प्रयत्न करू.
-पी.ए. चव्हाण, तलाठी, मूल.