उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती देताहेत लर्निंग लायसन्सची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:19 AM2021-06-20T04:19:48+5:302021-06-20T04:19:48+5:30
मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व याबाबत ...
मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व याबाबत माहिती असावी, यासाठी उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलीली परीक्षा देणे अनिवार्य आहे. कोरोनामुळे आता आधार कार्डच्या आधारे ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अनेक उमदेवारांच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्ती बसून परीक्षा देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जर उमेदवाराच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
बॉक्स
लायसन्स कायमस्वरूपी अपात्र
लर्निंग लायसन्स काढताना अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरणार आहे. तसेच ज्या महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे सदर सुविधेचा गैरवापर करताना आढळून येतील, अशा संस्थाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.
बॉक्स
गोपनीय पथकांची नियुक्ती
लर्निंग लायसन्स काढताना उमेदवाराऐवजी अनधिकृत व्यक्ती लर्निग लायसन्सची परीक्षा देऊ नये, म्हणून चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे गोपनीय पथक गठित करण्यात आले आहे. हे पथक महा इ-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे येथे डमी उमेदवार पाठवून पडताळणी करणार आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास त्या उमेदवारावर तसेच संबंधित नेट कॅफेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
-------
कोट
कोरोनाच्या सावटात नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. मात्र उमेदवाराऐवजी अनधिकृत व्यक्ती परीक्षा देत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्या आहेत. जिल्ह्यात असे आढळून आल्यास उमेदवारांवर तसेच संबंधित नेट कॅफेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्या उमेदवाराचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. आयपी एड्रेस ट्रेस करण्यात येणार आहे. एकाच आयपी एड्रेसवरून परीक्षा होत असल्याचे आढळून आल्यास त्याठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे.
-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर