भूमिगत दारूतस्कर पुन्हा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:16 PM2019-03-05T22:16:13+5:302019-03-05T22:16:29+5:30
आॅडिओ क्लिपमुळे पोलीस धास्तावल्याने त्यांनी दारू तस्करीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. याच संधीचा फायदा घेत दारूतस्कर पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी दारू तस्करीत कमालीची वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : आॅडिओ क्लिपमुळे पोलीस धास्तावल्याने त्यांनी दारू तस्करीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. याच संधीचा फायदा घेत दारूतस्कर पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी दारू तस्करीत कमालीची वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.
पोलीस व दारू तस्करांमधील देवाण घेवाणीच्या संवादाची आॅडिओ क्लिप समोर आल्यानंतर 'त्या' पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या क्लिपमुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. यात एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर अन्य पोलिसांवर संशयाचे ढग दाटले आहे. या प्रकारामुळे पोलीस चांगलेच धास्तावले आहे. याच संधीचा फायदा घेत भूमिगत दारूतस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. त्यांनी काही पोलिसांना चिरीमिरीचे आमीष दाखवून दारूतस्करी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे. यात लक्कडकोट, देवाडा, धोपटाळा, सास्ती, विरूर स्टेशन व रजुºयाच्या तस्करांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
राजुरा तालुक्याच्या सीमेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेलंगणा निर्मित दारूची आवक वाढली आहे. ही दारू लक्कडकोट, डोंगरगाव, सिंधी, नलफडी मार्गाने येत आहे. मधल्या काळात काही पोलिसांना दारू तस्करीची गुप्त माहिती मिळत होती. या आधारावर तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात होत्या. पण सध्या या गुप्तचरांनी माहिती देणे बंद करून गायब झाल्याने पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यातच माहिती देऊन देखील कारवाहीविषयी आशंका असल्याने त्यांनी हात वर केले आहे. दारूसाठा कमी दाखवून सेटिंगच्या शंकेने त्यांनी माहिती देणे बंद केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, तस्कर व पोलिसांमधील संभाषणाची क्लिप समोर आल्याने गुप्तचरांच्या शंकेला बळ मिळत आहे. मागील एक महिन्यांपासून एकही मोठी कारवाई झाली नसल्याने संशय बळावला आहे.
सध्या विरूर स्टेशनमधील एका तस्कराने सिंधी, नलफडी मार्गाने दारू तस्करी सुरू केल्याची माहिती आहे. तसेच लक्कडकोट, देवाडा येथील दारू तस्करातील काही भूमिगत तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देवाडा परिसरातील तस्करांनी मंगी गावात डेरा मांडल्याची माहिती आहे. राजुरा व धोपटाळा, सास्ती येथील तस्करांनी पोलिसांच्या दुर्लक्षितपणाचा पुरेपूर फायदा घेत दारूची आवक वाढविल्याची चर्चा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची खेप येत असतानाही मागील एक महिन्यात एकही मोठी कारवाई झाल्याचे पहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांची बघ्याची भूमिका निर्माण करणारी ठरत आहे.
दरम्यान, क्लिपमुळे पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहे की, त्यांचे तस्करांसोबत संबंध आहे, हे कळायला मार्ग नाही.