वडार समाजाच्या समस्या अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:09 AM2019-05-13T00:09:41+5:302019-05-13T00:10:28+5:30
सर्वत्र प्रगती- विकासाच्या वल्गना होत असताना दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हातात हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणाºया वडार समाजाच्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाही. त्यामुळे आतातरी या समाजाच्या समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वत्र प्रगती- विकासाच्या वल्गना होत असताना दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हातात हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणाऱ्या वडार समाजाच्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाही. त्यामुळे आतातरी या समाजाच्या समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे. ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. उष्माघाताने अनेकांच्या प्रकृती बिघडत आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोक कुलर, एसी लावून बसत आहेत, मात्र वडार समाजाच्या बांधवांना मात्र टीचभर पोटाच्या खळगीसाठी दररोज खडी फोडल्या शिवाय पर्याय नाही.
जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये वडार बांधक आहे. मात्र त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शासनस्तरावर याकडे लक्ष देऊन या समाजाला समाजप्रवाहात आणणे गरजेचे आहे.
संघटना नसल्याने अडचणी
वडार समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असल्याने राजकीय पक्षांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, समाजाची विशेष संघटनाही नसल्याने त्यांच्या समस्यांकडे शासनही दुर्लक्ष करीत आहे. गावागावात रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या या समाजाला शासनाने विशेष योजना राबवून समाजप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी समाजानेही एकसंघ होणे गरजेचे आहे.